• Sat. Mar 7th, 2026
    अंबरनाथमध्ये हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू, शिंदेंच्या सोहळ्याला रुग्णवाहिका नेल्याने उपलब्ध न झाल्याचा आरोप

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरण्यात आल्याने ती महिलेसाठी वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्याचा आरोप केला जात आहे

    एकनाथ शिंदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा : अंबरनाथ येथील एका ६६ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने तातडीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारासाठी पुढील रुग्णालयात हलवण्याआधीच तिची प्राणज्योत मालवली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरण्यात आल्याने ती वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्याचा आरोप करण्यात येत आहे. रुग्णालयाने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

    काय आहे प्रकरण?

    ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ शहरातील स्वामी नगर येथील ६६ वर्षीय मीना सूर्यवंशी यांना रविवारी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना गंभीर अवस्थेत छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना ठाणे किंवा मुंबई येथील रुग्णालयात हलवण्याची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध झाली नसल्याने सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंबरनाथ येथे धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरण्यात आल्यामुळे ती सूर्यवंशींना वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही, असा गंभीर आरोप केला जात आहे.
    Maharashtra TimesKabaddi Player Death : ऐन दिवाळीत प्रो कबड्डी लीगच्या चाहत्यांवर शोककळा, यू मुंबाच्या युवा कबड्डीपटूसह जयपूर पिंक पँथर सदस्याचा मृत्यू
    या आरोपांवर रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ. शुभांगी वाडेकर यांनी सांगितले की, ‘मीना सूर्यवंशी यांना रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हाच त्यांची स्थिती गंभीर होती. आवश्यक प्राथमिक उपचार करण्यात आले, तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, १५ मिनिटांच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही, हा आरोप तथ्यहीन आहे’.
    Maharashtra Timesलोकांना आलिशान गाड्या मिळतात… Diwali Gift वरुन कर्मचारी भडकले, कंपनीच्या गेटवर डबे भिरकावले, एकीने तर…
    अंबरनाथ पश्चिम भागातील सर्कस मैदान येथे धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे लोकार्पण रविवारी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी अशोक सराफ, महेश कोठारे, उषा नाडकर्णी, अलका कुबल, मकरंद अनासपुरे, विजय पाटकर, विजय गोखले, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, संतोष जुवेकर, अशोक पत्की, अशोक समेळ, मंगेश देसाई यासारखे दिग्गज कलाकार उपस्थित होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा