Maharashtra Weather Update : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई आणि महामुंबईत जोरदार पाऊस झाला. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुसळधार पावसाने हजेरी लावली, मात्र यामुळे दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडलं. पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ-बदलापूर, वसई-विरार परिसरात मंगळवारी वातावरणात उष्णता होती. दुपारनंतर वातावरण ढगाळ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरींनी मुंबई-महामुंबई परिसराला झोडपून काढलं. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तसंच व्यापाऱ्यांचीही मोठी धावपळ झाली.
Heavy Rain : कल्याणमध्ये महाभयंकर पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अनेक भागात बत्ती गुल
दिवाळीच्या निमित्ताने रस्त्यावर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचं पावसामुळे नुकसान झालं. अचानक पाऊस आल्याने रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली. वाहनांचा वेग मंदावला. फटाका व्यापारी वर्गाला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने त्यांच्या मालाचंही नुकसान झालं. तसंच दिवाळीत पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. कामावरून घरी परतणाऱ्यांनाही पावसाचा फटका बसला.
तीन दिवस हलक्या सरी
गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांत मुंबई, ठाणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. या काळात मेघगर्जनाही होऊ शकतात. दक्षिण कोकणात रत्नागिरी येथे शनिवारपर्यंत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात बुधवारी हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.
Navi Mumbai Rain |15 दिवसांतच रस्त्यांची दुर्दशा; रेती, खडी अधिकाऱ्यांना भेट, मनसे आक्रमक
रत्नागिरीतही पाऊस
रत्नागिरी शहरासह परिसरासह जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारनंतर परतीच्या पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली. सायंकाळी वीज गेल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना अंधारातच लक्ष्मीपूजनाच मुहूर्त साधावा लागला.

