• Sat. Jun 6th, 2026
    Nagpur Accident : भरधाव बसचा अचानक ब्रेक फेल, प्रसंगावधान दाखवत ड्रायव्हरनं वाहन झाडाला धडकावलं; अन्…

    Nagpur Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशातच नागपुरात दोन अपघातांच्या घटना घडल्या आहेत, पहिल्या अपघातात एका पादचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत बसचा ब्रेक झाल्यानं मोठा अनर्थ होता होता टळला आहे.

    नागपूर बस ब्रेक फेल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : जिल्ह्यात आज रविवारी सकाळी आणि काल शनिवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या. पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर वर्धा रोडवरील नागपूर मध्यवर्ती कारागृहाजवळ ‘आपली बस’चा ब्रेक फेल झाल्यानं मोठा अपघात टळला. दोन्ही घटनांमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

    नॅनो कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

    पहिल्या घटनेत, वाघोली गावातील किशोर हरिभाऊ उमाडे (वय 38) हे रविवारी पहाटे पाच ते सहा वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी महामार्गाच्या कडेला गेले होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वेगवान नॅनो कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत उमाडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृतदेह कारखाली अडकला होता. कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

    Maharashtra TimesRaj Thackeray : राज ठाकरेंनी फोडला मोठा बॉम्ब, महाराष्ट्रातील खोट्या मतदारांचा जाहीरपणे सांगितला आकडा, मुंबईतच…

    ‘आपली बस’चा ब्रेक फेल

    दरम्यान, काल शनिवारी सायंकाळी वर्धा रोडवरील नागपूर मध्यवर्ती कारागृहाजवळ ‘आपली बस’च्या ब्रेकने अचानक काम करणे बंद केल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या बसमध्ये सहा प्रवासी होते. चालकाने अत्यंत धाडस आणि प्रसंगावधान दाखवत बस थेट फुटपाथवर नेली आणि जवळच्या झाडाला धडकवून बस थांबवली. या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून फक्त एका महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली.

    अपघातानंतर प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी बसच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘आपली बस’ सेवेत असलेल्या वाहनांची नियमित तपासणी आणि यांत्रिक देखरेख करण्यात प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वर्धा रोडवरील या प्रकारामुळे बससेवेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    Maharashtra Timesखोटा करोना रिपोर्ट, चुकीचे उपचार अन् थेट अवयव तस्करी; कुटुंबियांना रुग्णालयातून बॉडी मिळालीच नाही… महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

    प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत. परिवहन विभागाला सर्व बसांची विशेष तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वाहनांची देखभाल आणि ब्रेकसह महत्त्वाच्या यंत्रणांची नियमित तपासणी करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा