• Fri. Sep 11th, 2026

रस्ते, पूल, इमारतींचे कामे दर्जेदार करावेत- मंत्री शिवेंद्रराजे भोसले – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 11, 2026

अमरावती, दि. ११ (जिमाका): सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते, पुल आणि इमारतींचे कामे केली जातात. ही कामे जनतेच्या सोयीसुविधांसाठी केली जात असल्याने ही कामे दर्जेदार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मंत्री श्री. भोसले यांनी अमरावती विभागातील बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार प्रविण पोटे, संजय खोडके, प्रकाश भारसाकळे, प्रताप अडसड, हरीष पिंपळे, सुलभा खोडके, राजेश वानखडे, उमेश यावलकर, प्रविण तायडे, किसन वानखडे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भोसले म्हणाले, धोकादायक पुलांची माहिती घेण्यात आली आहे. या पुलांची माहिती घेण्यात यावी. तसेच आवश्यक ती देखभाल, दुरूस्ती करण्यात यावी. ज्यामुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही, याची काळजी घ्यावी. पुलाला लोखंडी काठड्यांपेक्षा सिमेंटची कठडे उभारून कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे तपासून पहावे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत आहे. तातडीची उपाययोजना म्हणून मुरूमाने ही खड्डे भरण्यात यावीत. वनक्षेत्रातील रस्ते सध्या अस्तित्वात असलेल्या रूंदीमध्ये बळकट करणे शक्य आहे.

त्यामुळे विभागाने ही कामे सुचवावित.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते आणि इतर कामे करण्याअगोदर लोकप्रतिनिधींना अवगत करावे. यामुळे आवश्यक असणारे कामे सुटणार नाहीत. रस्त्यांची कामे झाल्यानंतर वृक्षारोपण करण्यात यावे. रस्त्यांच्या थोडी दूरवर झाडे लावल्यास भविष्यात रस्त्यांमध्ये अडथळा येणार नाही. तसेच कडूनिंब, वड आणि पिंपळाची झाडे लावल्यास ती दीर्घकाळपर्यंत टिकण्यास मदत होईल. ही झाडे जगविण्यावर भर देण्यात यावा. नागरिकांच्या सुविधांसाठी सुविधा केंद्र उभारण्यात येत आहे. ही केंद्रे सुस्थितीत राहणे आणि नागरिकांच्या वापरात राहण्यासाठी खासगी संस्थांना देण्यात यावी. आवश्यकता पडल्यास महिला बचतगटांना दिल्यास त्याची निगा राखली जाईल.

बैठकीत अमृतकाल रस्ते, विकास आराखडा, धोकादायक पूल, आदिवासी क्षेत्रातील इमारती आदीबाबत सादरीकरण मुख्य अभियंता सुषमा बोंद्रे यांनी केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed