• Mon. Mar 9th, 2026

    शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा दावा, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत टोकाची जुंपली, मेधा कुलकर्णींच्या अटकेची मागणी

    शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा दावा, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत टोकाची जुंपली, मेधा कुलकर्णींच्या अटकेची मागणी

    पुण्यात आगामी महापालिका निवडणुकांच्याआधी वेगळ्याच घडामोडी बघायला मिळत आहेत. पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला. त्यांनी तिथे जावून आंदोलनही केलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : “भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा”, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. “पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवरा बाबा. शनिवारवाडा ही वास्तू कोणाच्या बापाचा नाही. शनिवारवाडा मराठा साम्राज्य, पेशव्यांचा आहे. पुणेकर सर्व जाती धर्मांचे आहेत. मेधा कुलकर्णी पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांचं वातावरण खराब करत आहेत. जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहे. त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहेत”, अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.

    “कोथरुडमध्ये नाटकं झाली, आता कसब्यातून येऊन जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्यावरच तातडीने गुन्हा दाखल करा. खासदार ताईला प्रार्थना असो की दुवा करणे असो एकच आहे हे समजत नाही किंवा त्या जाणीवपूर्वक करत आहे. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यामध्ये येऊन जी नाटकं केली त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे”, अशी भूमिका रुपाली पाटील ठोंबरे यांनी मांडली.

    “खासदार बाईंच्या या कृत्याला तातडीने आळा घालणं गरजेचं आहे. भाजपला आमचं सांगणं आहे या खासदार बाईला आवरा. मेधा कुलकर्णी यांना जाणीवपूर्वक वातावरण बिघडवायचं असतं. खासदारकीची घेतलेली शपथ विसरून मेधा कुलकर्णी सातत्याने जाणीवपूर्वक पुण्यातील वातावरण बिघडवायचं काम करतात”, असा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला.

    नेमकं प्रकरण काय?

    पुण्याच्या शनिवारवाडा परिसरात आज भाजप खासदार मेधा कुलकर्णी, पतीत पावन संघटना आणि इतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. या परिसरात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ मेधा कुलकर्णी यांनी शेअर केला होता. त्यांनी या घटनेला विरोध केला. तसेच आंदोलकांनी गोमुत्र शिंपडून तिथल्या परिसराचे शुद्धीकरण केल्याचा दावा केला. आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

    संबंधित परिसरात असणारी मजार हटवा, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी परिसरात भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव केला. यामुळे परिसरात काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आपण भगवा झेंडा फडकवल्याशिवाय इथून जाणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना संबंधित जागा ही पुरातत्व विभागाकडे असल्याचं कारण सांगितलं. तसेच पुरातत्व विभागाचे अधिकारी येत असल्याचं पोलिसांनी आंदोलकांना सांगितलं. यानंतर थोड्या वेळाने आंदोलकांनी परिसरात भगवा झेंडा फडकवला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा