Solapur Murder News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी मिळून मित्राचीच हत्या केली आहे. मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून त्याला संपवलं आहे. या घटनेनं सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन मित्रांनी दारूसाठी पैसे मागितले होते
यतीराज शंकेची हत्या केल्याप्रकरणी आकाश तुळजाराम बलरामवाले आणि नवल खरे (दोघे रा. गरिबी हटाव झोपडपट्टी नं. 1, संघर्ष तरुण मंडळाजवळ) या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शंके हा शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घराजवळील संघर्ष तरुण मंडळाजवळ थांबला होता. त्यावेळी आकाश बलरामवाले आणि नवल खरे हे दोघे तेथे येऊन त्यांनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे नाही म्हणताच दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
Buldhana News: दिवाळीसाठी वडिलांना हातभार लावण्याची लगबग, पण स्पीड ब्रेकरने केला घात, एकुलता एक लेक गेला
पळत जाऊन कुऱ्हाड आणली अन् मानेवर घाव घातला
यतीराज हा मारहाण करताना जोरदार प्रतिकार करत होता. त्यावेळी आकाश बलरामवाले हा पळत जाऊन घरातून कुन्हाड घेऊन आला आणि पाठीमागून यतिराजच्या मानेवर वार केला. त्याचा आवाज ऐकून यतिराजची पत्नी प्रतिभा शंके या घटनास्थळी आल्या. त्यावेळी दोघांनी यतीराजच्या पत्नीस धक्काबुक्की केली. त्यामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता त्यापैकी यतिराज शंकेचा उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद मयताची पत्नी प्रतिभा यतिराज शंके (वय 35, रा. गरिबी हटाव झोपडपट्टी नं. 1) यांनी काल शनिवारी सकाळी पोलिसांत दाखल केली. त्याप्रमाणे विजापूर नाका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघे आरोपी घटनेनंतर पसार झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

