उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीच्या नागरिकांना खुली ऑफर दिली. विकासकामांच्या ठिकाणी होत असणाऱ्या चोरीला अजित पवार वैतागले आहेत. त्यामुळे अजित पवारांनी आज त्याबाबत संताप व्यक्त केला.
बारामतीतील एका कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बोलता बोलता.. अजित पवारांनी बारामती शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. बारामतीचा नीरडावा कालवा देखील स्वच्छ ठेवला पाहिजे, अशा स्वरूपाचे भाष्य केले. याच दरम्यान बोलताना त्यांनी विकास कामांची माहिती देत होणाऱ्या चोऱ्यांची देखील माहिती दिली.
“कचऱ्याची योग्य विल्हेवाट झाली पाहिजे. त्यासाठी सगळ्या सुविधा आहेत. मात्र तसे होताना दिसत नाही. मी बारामतीत एवढा मोठा चांगला ब्रिज केला आहे. असं असताना देखील तिथं काहीजण चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे मी लोखंडी अँगल पायरी खराब होऊ नये म्हणून लावला आहे. साले तेच तोडून नेत आहेत. मी तर तुम्हाला आवाहन करतो की, अशा खूप घटना घडत आहेत. अशा पट्ट्या चोरून नेतात आणि उद्या विकून टाकतात. उद्या एखाद्या वेळेस त्या ब्रिजवरून कोण चाललं आणि तो ब्रिज पडला, तर पुन्हा म्हणणार कशा पद्धतीने विकास केलाय?”, असं अजित पवार म्हणाले.
“मात्र असं जर कोण करत असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये त्याला न कळता त्याचं चित्रीकरण करा आणि मला आणून द्या. जो ते मला आणून देईल त्याला मी ‘एक लाख’ रुपयाचे बक्षीस देईन आणि जो सापडेल त्याला दोन लाख दंड करतो. म्हणजे त्यातील एक लाख रुपये याला देऊन टाकू आणि एक लाख रुपये नगरपालिकेला देऊन टाकू. त्यातून नगरपरिषद स्वच्छ करून टाकू”, असंही अजित पवार म्हणाले.
‘जित्राबं माझ्या बारामतीत का आहेत?’
दरम्यान, अजित पवार यांनी लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी त्यांना जखमा होऊ नयेत म्हणून समुद्रातील वाळू आणून टाकली असल्याचा उल्लेख केला. “वृद्ध माणसांना बसायला तिथे जागा केली. तिथे समुद्राची वाळू आणून टाकली. काही शहाण्यांनी रात्री त्यातली वाळू पिशवीत भरून चोरली, ही जित्राबं माझ्या बारामतीत का आहेत? मला प्रश्न पडलाय यांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. मी काही चांगलं केलंय त्या ठिकाणी ते गोधड्या सुखवायला आणून टाकत आहेत. अरे तुझ्या घरात काय टाकायचे ते टाक ना. मी जे चांगले केले त्याचा आणून का टाकतो”, अशा शब्दांत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.

