Nanded News : नांदेडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विजेचा धक्का लागून एका महिलेचा हृदयद्रावक अंत झाला आहे. त्यांच्या चारही मुली आईविना पोरक्या झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, त्यांचं संपूर्ण कुटुंब दिवाळीच्या मुर्हूतावर नवीन घरात प्रवेश करणार होते. पण या आनंदाच्याक्षणी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
चारही मुलींचं मातृत्व हरपलं
शिवकांता गिरी आणि त्यांचे पती माधव गिरी हे दोघेजण मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवायचे. त्यांना 15, 14, 10 आणि 6 वर्षाच्या अशा चार मुली आहेत. मोलमजुरी करून मुलींना शिकवायचे. काही दिवसापूर्वी त्यांना घरकुलमध्ये घर मंजूर झालं होतं. घराचं काम अंतिम टप्यात होतं. दिवाळी सणानंतर गृह प्रवेश होणार होता. मात्र, नियतीला हे मंजूर नव्हतं. दोन दिवसापूर्वी घरातील काम करत असताना शिवकांता यांना विजेचा शॉक लागला आणि यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं गावात शोककळा पसरली. शिवाय घटनेनं चारही मुलींचं मातृत्व देखील हरपलं आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीत हलाकीची असल्यानं मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा गावकऱ्यांनी एकत्र येत मोठ्या मुलीला दत्तक घेऊन शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी घेतली. गावकऱ्यांच्या या निर्णयाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
Unique Village : संध्याकाळनंतर गावात रडण्यास बंदी, कोकणातील हे गाव कोणतं? फास्ट जगात आजही जपली जातेय अनोखी प्रथा
अर्ध आयुष्य भाड्याच्या घरात
दरम्यान, घराचं काम अंतिम टप्प्यात आलं होतं. अर्ध आयुष्य भाड्याच्या घरात घालवलं. आता स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्याची वेळ आली. दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करण्यात येणार होता. पण, नियतीला कदाचित हे मान्य नसावं. घरातील गृहलक्ष्मीवर दुर्दैवाने काळाने झडप घातली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. चार मुलींवरचं मातृत्वाचं छप्पर हरवलं आहे. गिरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांना मानसिक व आर्थिक आधार देण्याची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढे यावं, असं आवाहन समाज माध्यमातून करण्यात येत आहे.

