Ratnagiri News : परतीचा पाऊस सुरू झाला आणि एका शेतात भात कापणी करणाऱ्या एका तरुणाच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
सुशील शिवराम पवार हे शेतात भात कापणी करत असताना वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दोन पोती भाताची कापून आणल्यावर तिसरं पोतं जमा करत असतानाच अंगावर वीज कोसळली आणि त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने संपवलं आयुष्य, घरात बॉडी सापडली; तीन पानी चिठ्ठी लिहून, व्हिडिओ करत कारणही दिलं
वीज कोसळल्यानंतर सुशील यांच्यासोबत काम करणारे इतर 6 जणही जखमी झाले. उत्तम भिवा पवार वय 65, संतोष विठ्ठल कांबळे वय 55, संदीप लक्ष्मण पवार वय 52, सुलोचना कांबळे वय 65, सुजाता रामदास पवार 35, रोशन रामदास पवार वय 19 हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना रात्री उशिरा घरी सोडण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
नद्यांना पूर, रस्ते पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, कोकणात मुसळधार पाऊस!
मात्र या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेले सुशील शेतकरी होते. तसंच ते इलेक्ट्रिशनचंही काम करत. आता सुशीलच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सुशील यांच्या मृत्यूने त्यांच्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं आहे. बुधवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. सुशील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान भाऊ आणि सुशील याचा एक साडेतीन वर्षांचा चिमुकला असं कुटुंब आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेले सुशील पवार यांच्यावर गुरुवारी मुर्तवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

