विरोधकांच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. पण या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते शरद पवार नव्हते. या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा दावा केला आहे.
विरोधकांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे दिले पाहिजेत. कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न हे करत आहेत. मी तर आज सगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे. पण मी असं ऐकलं की, कुणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे. हो आमचंही सहकार्य करण्याची तयारी आहे. निवडणुका चांगल्या झाल्या पाहिजेत. मतदार याद्यांमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या दोन दिवसांच्या त्यांच्या चकरा या फियास्को आहेत. त्यांना कल्पना देखील नाही की कुणाकडे काय मागणी केली पाहिजे. मला असं वाटतं म्हणूनच या सगळ्यांमध्ये ज्यांना समजतं ते शरद पवार आहेत. त्यांच्या कालच लक्षात आलं आणि म्हणून शरद पवार आज त्यांच्यासोबत गेले नाहीत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर घणाघात
“इतके संभ्रमित झालेले विरोधक मी माझ्या जीवनात बघितले नाहीत. इतके मोठेमोठे लोकं हे सगळे, त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे, हे माहिती आहे की नाही ते मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की, त्यांना सगळं माहिती आहे. केवळ परसेप्शन निर्माण करण्याकरता, निवडणुकीत आपण हरलो तर आधीच परसेप्शन क्रिकेट करण्याकरता ते करत आहेत. कारण काल ते राज्याचे निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्याकडे गेले होते. पण चोक्कलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काहीच नाहीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगळा कायदा आहे. त्यातून स्टॅट्यूटरी इलेक्शन कमिशन तयार झालं आहे. ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे. त्याच्यावर कंट्रोल करण्याचा पूर्ण अधिकार हा कायद्याने त्यांना देण्यात आला आहे. तो राज्य सरकारचा देखील नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“काल हे सगळे महाभाग चोक्कलिंगम यांना भेटायला गेले. त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की, आपल्याला दिनेश वाघमारे यांना भेटायचं होतं. मग काल त्यांच्याशी चर्चा करुन काहीतरी थातूरमातूर सांगितलं. म्हणाले, हे इलेक्शन कमिश्नर त्या इलेक्शन कमिश्नर यांना बोलावणार आहेत. आता या निवडणूक आयुक्तांना त्या निवडणूक आयुक्तांना बोलावण्याचा अधिकार नाही. या दोन वेगळ्या बॉडीज आहेत”, असं ते म्हणाले.
“स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ते इलेक्शन कमिशन कंडक्ट करतात. आता ते त्यांना भेटले. त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही. मुळात एक गोष्ट लक्षात घ्यावी, राज्याचं निवडणूक आयोग हे पूर्ण निवडणुका आयोजित करत. विधानसभा आणि लोकसभेच्या मतदार याद्या आहेत त्या ते अॅडॉप्ट करतात. त्यानंतर त्यावर सगळ्यांना आक्षेपची संधी देतात. या संधीच्या काळात त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर केलं पाहिजे. असं काही करायचं नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम ते करतात”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

