Pune News: पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर केलं असून नागरिकांना हरकती नोंदवता येणार आहेत.
या प्रक्रियेत 1 जुलै 2025 रोजी निश्चित करण्यात आलेली विधानसभा निवडणूक मतदार यादीच पुणे महापालिका निवडणुकांसाठी आधारभूत ठरणार आहे. त्यामुळे या तारखेनंतर मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट केली जाणार नाहीत. परंतु, मतदारांच्या नावांमध्ये किंवा पत्त्यांमध्ये काही तांत्रिक चुका असल्या तर त्या दुरुस्त करण्याची संधी देण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याची सविस्तर प्रक्रिया व वेळापत्रक जाहीर केलं आहे.
महापालिका आयुक्तांकडन एका अधिकृत अधिकाऱ्याला ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा अधिकारी निवडणूक आयोगाकडून मिळालेली यादी प्रसिद्ध करणार असून यानंतर, नागरिकांना या यादीवर हरकती नोंदवण्यासाठी वेळ देण्यात येईल. या हरकतींमध्ये प्रामुख्याने लेखनातील चुका, एखाद्या मतदाराचं नाव चुकून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झालं असेल किंवा विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नाव असूनही पुणे महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या यादीतून वगळलं गेलं असेल, अशा त्रुटी सुधारल्या जातील.
दरम्यान, जर यादीत मृत व्यक्तींची नावे आढळली किंवा तशा हरकती प्राप्त झाल्या, तर त्यांची नोंद ‘मार्क कॉपी’ मध्ये होणार आहे. आयुक्तांनी ही प्रारूप यादी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ती स्थानिक वृत्तपत्रांमध्ये, महानगरपालिका व प्रभाग समिती कार्यालयांच्या सूचना फलकांवर तसंच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. यामुळे मतदारांना त्यांच्या नावांची पडताळणी करणं सोपं होणार आहे.

