Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण शिवारात दुचाकीवरील वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. पतीने पत्नीला तुरीच्या शेतात नेऊन दगडाने मारहाण केली व गळा आवळण्याचा प्रयत्न केला. आठ वर्षांच्या चिमुकलीने आईचे प्राण वाचवले.
घोडेगाव येथील एक व्यक्ती शनिवारी (दि. ११) आपल्या पत्नी व मुलीला घेण्यासाठी भोसा (ता. कर्जत) येथे गेला होता. दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी जेवणानंतर ते घोडेगावकडे निघाले. परंतु, रस्त्यात भिंगाण शिवारात त्याने दुचाकी थांबवून पत्नीला तुरीच्या शेतात नेले आणि निर्दयपणे मारहाण सुरू केली. तिच्या डोक्यावर दगडाने वार करून गळा आवळण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून घाबरलेली मुलगी पळत भिंगाण गावात आली आणि मदतीसाठी हाका मारल्या. तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेचा जीव वाचवला. सदर महिला गंभीर जखमी असून, तिला दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सराईत गुन्हेगार पती फरार
माहितीनुसार, आरोपी पती हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. घटनेनंतर तो पसार झाला आहे. श्रीगोंदा पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले असून, पोलीस त्याच्या शोधात आहेत. जखमी महिलेच्या वडिलांनी भावनिक शब्दांत सांगितले की, आम्ही यापूर्वीही आमच्या जावयाविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पण, त्यावेळी कठोर कारवाई झाली नाही. पोलिसांनी गंभीरतेने घेतलं असतं, तर आज ही घटना घडली नसती.
चिमुकलीचे धाडस सलाम करण्यासारखे
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. फक्त आठ वर्षांच्या मुलीने दाखवलेली समयसूचकता आणि धाडसामुळे तिच्या आईचे प्राण वाचले, याबद्दल सर्वत्र तिच्या धैर्याचे कौतुक होत आहे. श्रीगोंदा पोलीस पुढील तपास करत आहेत.

