Ajit pawar on sangram jagtap: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीत फक्त हिंदूंकडूनचं खरेदी करण्याचे आवाहन केले होते. या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवार म्हणाले….
आज माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, संग्राम जगतापांचे हे वक्तव्य मला मान्य नाही. “त्यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय-धोरणे ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून कुठलाही खासदार-आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील, तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य नाहीत””खरंतर अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत तिथं सगळं सुरळीत होतं. पण आता काही लोकांनी, आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या वडिलांचं छत्र आपल्यावर राहिलं नाहीये, त्यामुळे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सर्वांना पुढे घेऊन जाणारा आहे,” असं वक्तव्यही अजित पवारांनी यावेळी केलं आहे. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हाही संग्राम जगताप यांना सांगितलं होतं. ते म्हणाले होते की मी यामध्ये सुधारणा करेन, पण सुधारणा करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची जी भूमिका आणि विचार आहेत ते पक्षाला मान्य नाहीत, आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत.”
मविआने मागच्या निवडणुकीत गाढवपणा केला नसता तर केंद्रात भाजप नसतं : प्रकाश आंबेडकर
संग्राम जगताप यांचं वक्तव्य काय होतं?
सोलापूरात हिंदू आक्रोश मोर्चात बोलताना संग्राम जगताप म्हणाले होते की, “मी दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना विनंती करेन, जो-जो दिपावलीच्या निमित्ताने काही खरेदी करेल, ती खेरेदी करताना आपला पैसा आणि नफा फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच मिळाला पाहिजे, अशा प्रकारची दिपावली आपण साजरी करावी”, असं वक्तव्य संग्राम जगतापांनी केलं होतं.

