Shivsena Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे विविध आरोप विरोधकांनी केले होते. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा करत मंत्री संजय शिरसाट यांची शासनस्तरावर तीन प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वी विरोधकांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, आता मात्र विरोधक या प्रकरणात शांत झाल्याचे चित्र आहे, असे पत्रकारांनी अंबादास दानवे यांना विचारले असता ते बोलत होते. अंबादास दानवे म्हणाले, संजय शिरसाट यांच्यावर आम्ही आरोप केले होते व या आरोपांची चौकशी शासनाने करावी अशी मागणी केली होती. शासन चौकशी करेल याचा आम्हाला विश्वास होता. शासनाने त्यांची तीन प्रकरणात चौकशी सुरु केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. चौकशी सुरु असल्यामुळे आम्ही सध्या शांत आहोत.
महापालिकेच्या निवडणूकीसाठी राज्यातील अन्य काही शहरांमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात पक्षाची काय भूमिका आहे असे दानवे यांना विचारले असता ते म्हणाले, सध्या आम्ही आपलीच तयारी करत आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जसे निर्देश येतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल. सध्यातरी आम्ही कोणत्याही पक्षाशी चर्चा केलेली नाही.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. याबद्दल बोलताना दानवे म्हणाले, “कबुतर, कुत्रे या बद्दलचे निकाल न्यायालयात लागतात, पण पक्ष आणि चिन्हाबद्दल तारीख पे तारीख दिली जाते. न्यायालयाबद्दल काही बोलता येत नाही. भगवान के घर देर है अंधेर नही, यावर आमचा विश्वास आहे,” असा उल्लेख त्यांनी केला. शिवसेना ठाकरेंचीच आहे, ती दुसऱ्यांची होऊ शकत नाही असे ते म्हणाले. यावेळी महानगर प्रमुख रेणुकादास (राजू) वैद्य यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

