Chhatrapati Sambhajinagar Woman Ends Life: सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून आणखी एका विवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे.
राधा संतोष शेळके (वय 22 रा. नांदर पैठण) असे गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, राधा ही सुंदर वाडी झाल्टा येथील रहिवासी असून तिचा विवाह संतोष शेळके यांच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा एक मुलगी अशी जुळी मुलं आहेत. काही दिवस चांगली वागणूक दिल्यानंतर सासरच्या मंडळींनी छळ करायला सुरुवात केली.
घर बांधण्यासाठी तुझ्या वडिलांकडून दोन लाख रुपये आण, अशी सासरच्या मंडळींची मागणी होती. वडिलांची परिस्थिती गरीब असल्याने वडील पैसे देऊ शकत नाही असं राधाने सासरच्या मंडळींना सांगितले. दरम्यान 2022 पासून राधाचा सासू कमलबाई शेळके, मोठा दीर राजेंद्र शेळके, जाऊन निकिता राजेंद्र शेळके, ननंद जनाबाई अमोल राठोड राहणार नारायणगाव जिल्हा बीड यांनी छळ केला. या प्रकरणी राधाने माहेरच्या मंडळींना सांगितले होते. यावेळी कुटुंबीयांनी तिची समजूत काढली. मात्र, सततच्या त्रासाला राधा कंटाळली होती. अखेर तिने टोकाचा निर्णय घेत शेतातील शेततळ्यात उडी घेऊन आयुष्य संपवले.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
घटनेची माहिती मिळाल्यानंतर माहेरच्या नागरिकांनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. सासरच्या मंडळींनी मुलीचा छळ केल्यामुळे तिने आयुष्य संपवलं. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत चविच्छेदन करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी समजूत काढली. परिस्थिती पाहता पोलिसांनी अंत्यविधीसाठी बंदोबस्त लावत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. याप्रकरणी पाचोड पोलिसांना सासरच्या व्यक्तीने विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

