आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात जोरदार पक्षप्रवेश सुरु आहेत. कोल्हापुरात भाजपने मोठा राजकीय गेम खेळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थानिक पातळीवरचा बडा नेता भाजपात दाखल झाला आहे. त्यामुळे भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
प्रवीणसिंह पाटील यांनी गेल्या पाच दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत कार्य केले होते. अलीकडे ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. मात्र, वैयक्तिक तसेच राजकीय कारणांमुळे त्यांनी पक्षत्याग करीत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून होणारे दुर्लक्ष आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी असलेले विसंवाद हे या निर्णयामागचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला मोठा आधार मिळेल, असे राजकीय विश्लेषक मानत आहेत.
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली. “प्रवीणसिंह पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपाची पकड कागल तालुक्यात अधिक मजबूत होईल. त्यामुळे आगामी मुरगुड नगरपरिषद निवडणुक जिंकली समजा”, असा विश्वास देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही या प्रवेशाचं स्वागत करत नवीन नेतृत्वामुळे भाजप कागल परिसरात अधिक प्रभावीपणे काम करेल, असं मत व्यक्त केलंय.
दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिकांच्या आरक्षणात मुरगुड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झालं आहे. अशा वेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. पाटील यांचा समर्थकांसह भाजपात झालेला प्रवेश हे स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवणारे ठरणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, तुकडाबंदी कायद्यात सुधारण्यास मंजुरी, महाराष्ट्रातील छोट्या प्लॉट धारकांना दिलासा
या घडामोडींमुळे कोल्हापूरच्या राजकीय समीकरणात काही नव्या हालचाली पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. विशेषतः महायुतीतीलच भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात आता चढाओढ अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

