महायुतीत आता शाब्दिक संघर्ष होताना दिसत आहे. भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि शिवसेना यांच्यात आता टोकाचा संघर्ष बघायला मिळतो आहे. गणेश नाईक यांनी थेट नालायक असा शब्दप्रयोग केला आहे. त्यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीदेखील प्रत्युत्तर देत मोठा इशारा दिला आहे.
“नालायकांच्या हातात नवी मुंबई महापालिका गेली तर वाटोळं होईल”, अशा शब्दांत भाजप आमदार तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “14 गावं आम्हाला नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत नको. कुणाच्यातरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू?”, असं गणेश नाईकांनी म्हटलं आहे. त्यावर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मंत्री गणेश नाईक काय म्हणाले?
“14 गावे आमच्यात नको आहेत. निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांत ती गावं आपण बाहेर काढू. ती गावं निश्चित बाहेर निघतील. ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याची पुण्याई कामाला लावेल. ती लोकं आमचीच आहेत. कुणाच्या तरी लहरीपणाचा बोज आमच्या नवी मुंबईच्या जनतेवर का टाकू? नालायक लोकांच्या हातात ही सत्ता गेली तर या शहराचं वाटोळ झालं असं समजायचं”, असा घणाघात गणेश नाईक यांनी केला.
मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर
गणेश नाईकांना उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “नवी मुंबईची जनता महानगरपालिकेची सत्ता 100 टक्के त्यांच्या हातात सत्ता नाही. त्याची चिंता करायची आवश्यकता नाही. त्यामुळे नालायक कोण हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. वाण नाही तर गुण काही लोकांना लागतो. तसाच शिवीगाळ करण्याचा गुण त्यांनाही लागला आहे. ते असं म्हणाले की, नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये. नवी मुंबईची जनता त्यांच्या हातात सत्ता देणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही करावा”, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.
“मी समन्वय समितीमध्ये जरी असलो तरी माझ्या नेत्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्यांच्यावर टीका केलेली सहन करणार नाही. त्यांना काही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही”, असा इशारा उदय सामंत यांनी दिला.
“गणेश नाईक यांनी माझ्यापेक्षा अनेक राजकीय पावसाळे बघितले आहेत. त्यामुळे त्यांच्या शंका-कुशंका ज्या काही असतील, त्यांनी एकनाथ शिंदे यांची वेळ घ्यावी. ते उपमुख्यमंत्री आहेत. उगाच एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेबद्दल टीका टिप्पणी करण्यापेक्षा युबीटीवर टीका करावी”, असा सल्ला शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गणेश नाईक यांना दिला आहे.

