नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर येत आहे. अपघातग्रस्त रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता ट्विस्ट येताना दिसत आहे.
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी पहाटे अपघाताची घटना घडली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटील हिच्या गाडी चालकाला अटक केली होती. दरम्यान, ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली ते वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे. या अपघात प्रकरणी चौकशीसाठी हजर राहावे असे या नोटीसमध्ये बजावण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सामाजी विठ्ठल मरगळे असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गौतमी पाटील विरोधात आंदोलन केलं. गौतमी पाटीलचे राज्यातील शो बंद करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी सिंहगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं.
या अपघातातील जखमी ऑटो रिक्षा चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षा चालकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गौतमीला चौकशीसाठी 30 सप्टेंबरला बोलावल्याची माहिती होती. पण ती चौकशीसाठी न येता शो करत महाराष्ट्रात फिरत असल्याने ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक झाली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. यानंतर आता पोलिसांनी पुन्हा नोटीस पाठवल्याची माहिती समोर येत आहे.
‘गौतमीला अटक करा’, पीडित कुटुंबियांची मागणी
दुसरीकडे अपघातग्रस्त रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी गौतमी पाटील हिला अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी मागणी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. “ती गाडी जिथून स्टार्ट झाली तिथून ती कुठे थांबली. गाडीत कोण होतं, कोण कुठे उतरलं, याचे रेकॉर्ड्स आमच्यापर्यंत यावेत. आम्हाला हे पाहायचं आहे. आम्हाला पूर्णपणे संशय आहे की, गाडीचा चालक बदलला गेला आहे. गाडी मालक गौतमी पाटीलला आतापर्यंत का अटक झाली नाही? आपलं प्रशासन का एवढं थंड आहे?”, असे सवाल रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी केला आहे.

