विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन यावर्षी केवळ दोन आठवड्यांचं असण्याची शक्यता आहे.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील गाजत आहे. धनगर आणि वंजारी हे देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे संपूर्ण राज्यभर पाहण्यास मिळत आहे. ही पार्श्वभूमी असतानाच राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सहित पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांचे संसार देशोधडीला लागले आहेत.
शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी, कर्जमाफीसाठी सरकारकडे तगादा लावला असतानाच राज्य सरकारकडे मागील सरकारच्या काळातील नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास विभाग, जलसंपदा विभाग यासह अन्य खात्यांमधील विकास कामांची देयके मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याने राज्यातील ठेकेदार हवालदील झाले आहेत.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर २०२५ पासून चालू होत असून पहिल्याच दिवशी अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे, तसेच २०२५ च्या पुरवण्या मागण्या सादर करणे, शासकीय कामकाज अशी कामे असू शकणार आहेत.
हिवाळी अधिनेशनाचं वेळापत्रक कसं अशू शकतं?
- ९ डिसेंबर २०२५ – शासकीय कामकाज
- १० डिसेंबर २०२५ – शासकीय कामगार पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (पहिला दिवस)
- ११ डिसेंबर २०२५ – शासकीय कामगार पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान दुसरा व शेवटचा दिवस, पुरवणी विनियोजन विधेयक
- १२ डिसेंबर २०२५ – शासकीय कामकाज
- १३ डिसेंबर आणि १४ डिसेंबरला शनिवार, रविवार शासकीय सुट्टी असेल
- १५ डिसेंबर २०२५ – शासकीय कामकाज
- १६ डिसेंबर २०२५ – शासकीय कामकाज
- १७ डिसेंबर २०२५ – शासकीय कामकाज
- १८ डिसेंबर २०२५ – शासकीय कामकाज
- १९ डिसेंबर २०२५ – शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज अशी तात्पुरता कामकाज पत्रिका तयार करण्यात आली आहे
एकंदरीतत नागपूरचे हिवाळी अधिवेशन कामकाज पत्रिकेत दोन आठवड्याचे असले तरी पहिल्या आठवड्यात ११ डिसेंबर २०२५ रोजी पुरवणी विनियोजन विधेयक सादर झाल्यानंतर अधिवेशनात फारसे कामकाज होणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहे. शुक्रवारी १२ डिसेंबर२०२५ रोजी अधिवेशन संस्थागीत करून अधिवेशनाचे सुपं वाजणार असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन हे नेहमीप्रमाणे राजकीय समीकरणासाठी गाजत असल्याचे आतापर्यंत झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावरून दिसत असताना, राज्यातील सत्ताधारी तीन पक्षांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद आणि कुरघोड्या, त्यानंतर राज्य विधिमंडळातील विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती, त्याच बरोबर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अधिवेशनात संघर्ष होण्याची शक्यता आहे.

