मराठवाड्याला रविवारी मुसळधार पावसाने झोडपले. दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू असल्यामुळे मराठवाड्यात पूर परिस्थिती बिकट झाली आहे. विभागात १८९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडल्याने नदीकाठची गावे आणि शेतीला धोका निर्माण झाला आहे. गोदाकाठचा ५० गावांशी संपर्क तुटला आहे.
जालना १५, बीड ४८, लातूर ४, धाराशिव ७, नांदेड १३, परभणी ११ आणि हिंगोली ११ अशी जिल्हानिहाय मंडळात अतिवृष्टी झाली आहे. गंगापूर, वैजापूर या कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यातील काही मंडळात १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विभागात सरासरी ५५.६ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११०.३ मिमी पाऊस झाला आहे. जालना ६२.९, बीड ६३.८, लातूर २५.४, धाराशिव ३९, नांदेड २६.२, परभणी ४४.५ आणि हिंगोली ५५.५ असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे.
जालना जिल्ह्यात जोरात पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील राजाटाकळी, मंगरुळ, जोगलादेवी, पाथरवाला, लोणी सावंगी या पाच उच्च पातळीच्या बंधाऱ्यातून विसर्ग सुरू आहे. जालना, बदनापूर, भोकरदन, मंठा, अंबड, जाफ्राबाद तालुक्यात पशूधनाची हानी झाली आहे. अनेक भागात पिके पाण्यात बुडाली आहेत. नांदेड जिल्ह्यातही मुदखेड, धर्माबाद, नायगाव, देगलूर या तालुक्यात पूर परिस्थिती कायम आहे. अनेक गावे पुराने वेढलेली असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यात पूर परिस्थितीमुळे संकट निर्माण झाले आहे. खामगाव (ता. धाराशिव) येथे गावात पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले आहे. मात्र, दलित वस्तीत योग्य सर्वेक्षण होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हिंगोलीत पुराचे संकट
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून कयाधू नदीला पूर आला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे कळमनुरी तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरले आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे हिंगोली-समगा रस्ता बंद झाला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे १३ दरवाज्यातून २२ हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. येलदरी प्रकल्पातून ३२ हजार १८० क्युसेक विसर्ग आणि सिद्धेश्वर प्रकल्पातून २५ हजार ६३८ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
पैठण शहरात पाणी
उर्ध्व भागात आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे जायकवाडी धरणातून रविवारी दुपारी साडेतीन वाजता आपत्कालीन नऊ दरवाजे आठ फुटापर्यंत उचलून ९४३२ क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एकूण १८ नियमित व नऊ आपत्कालीन दरवाजामधून एकूण दोन लाख २६ हजार ३६८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरामध्ये पूरजन्य परिस्थिती आहे. नवगाव पूल पाण्यात बुडाल्याने ८० गावांचा संर्पक तुटला आहे. पैठण शहरातील परदेशीपुरा, कहारवाडा, साठेनगर, लहुजीनगर, संतनगर भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

