Beed Journalist Son Murder Case: बीडमध्ये स्थानिक पत्रकाराच्या मुलाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. आता याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी रस्तारोको करत न्यायाची मागणी केली आहे.
पोलिसांनी यशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या बीड येथील जिल्हा रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. या घटनेने बीडमध्ये एकच खळबळ माजली असून नातेवाईक आणि मित्र परिवाराने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Beed Crime: यशला भररस्त्यात संपवलं, बाईक-शूज तसेच पडून; बीड पत्रकाराच्या लेकाच्या हत्येचं गूढ उलगडलं
या घटनेने संतप्त झालेले नातेवाईक आणि मित्रपरिवार आता थेट बीडच्या रस्तावर उतरला आहे. बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोर नातेवाईक आणि मित्रांनी अचानक रास्तारोको आंदोलन सुरू केले. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी केली जात आहे. भर पावसात हे रस्ता रोको आंदोलन सुरू असून तात्काळ पोलिस अधीक्षकांना बोलाऊन घ्या अशी मागणी होत आहे. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाल्याचे पाहवयास मिळत आहे. यावेळी आंदोलकांनी जोरजोरात घोषणाबाजी केली.
25 सप्टेंबरला दुपारी सुरज आणि यश यांच्यात वाद झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले असताना एकमेकांकडे बघण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रात्री यशने हा वाद मिटवण्यासाठी सूरजला बोलावून घेतलं. मात्र, माने कॉम्प्लेक्स परिसरात त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि सूरजने चाकूने यशवर हल्ला केला. या घटनेत यश गंभीर जखमी होऊन कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.
यशच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अशाप्रकारे मुलाचा मृत्यू होईल याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. तर, त्याच्या मित्रपरिवारही या घटनेने शोकसागरात बुडाला आहे.

