• Fri. Jun 19th, 2026

    साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी – महसूल व सामाजिक न्याय मंत्री यांचे निर्देश  – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 23, 2025
    साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी – महसूल व सामाजिक न्याय मंत्री यांचे निर्देश  – महासंवाद




    मुंबई, दि. २३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी कार्यवाही विलंब न लावता तातडीने करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

    सामाजिक न्याय मंत्री यांच्या दालनात मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा येथील वास्तव्यास असतानाच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणे संदर्भात बैठक झाली. या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, दूरदृश्य प्रणालीद्वारे साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहसचिव सो. ना. बागुल, सहसचिव श्रीराम यादव, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, स्मारकाच्या जागेबाबत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेले दावे न्यायप्रविष्ट असल्यामुळे, जोपर्यंत संबंधित दाव्याचा निकाल लागत नाही किंवा दावेदार स्वतः दावे मागे घेत नाहीत, तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही. याचिकेच्या सुनावणीवेळी पुरातत्त्व विभागाने संबंधित प्रकरणातील शासकीय अभियोक्ता यांचेकडे हे प्रकरण बरेच वर्षे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणावे आणि प्रकरणाची सुनावणी घेऊन प्रकरण निकाल काढण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी करण्याचे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

    सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, या स्मारकाच्या उभारणीतून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा व्यापक प्रसार होणार असून, भावी पिढ्यांसाठी हे स्थळ प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभाग,जिल्हाधिकारी सातारा व पुरातत्त्व विभागाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ/

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed