सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील एका पूरग्रस्त नागरिकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सीना नदीला पूर आल्याने संपूर्ण गाव उंचावर असलेल्या मंदिरात आले आहेत. या मंदिराच्या चहूबाजूने पुराचं पाणी वेढलेलं बघायला मिळत आहे. एखाद्या वाईट स्वप्नासारखा अनुभव गावकऱ्यांना येत आहे. गावकऱ्यांकडून प्रशासनाकडे मदतीची विनंती केली जात आहे.
गावकरी व्हिडीओत काय म्हणतोय?
“सोलापूरच्या करमााळा तालुक्यातील संगोबा सीनाकाठी नदीकाठी आम्ही सर्व ग्रामस्थ, महसूल प्रशासनातील 12 तलाठी, 2 सर्कल आणि पोलीस पाटील, कोतवाल आहेत. आम्ही रात्रीपासून या पूर परिस्थितीत अडकलो आहोत. महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या यंत्रणेला आम्हाला सांगायचं आहे. कृपया आमची सूटका करा. आमचं बचावकार्य करावं. एनडीआरएफ किंवा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य करावं. आमची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावं”, अशी विनंती संबंधित व्यक्ती करत आहे. “महसूल प्रशासनाने आम्हाला मदत केली आहे. आमचे आमदार नारायण आबांना आम्ही संपर्क केला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संपर्क केला आहे. सोलापूर जिल्ह्याचे नैसर्गिक आपत्तीचे प्रमुख ढोणे यांच्याशी बोललो आहोत. तहसीलदार शिल्पा मॅडम यांनी आतापर्यंत सर्व मदतकार्याला सुरुवात केली आहे. आमची शासनाला आणि सर्व यंत्रणाला हात जोडून विनंती आहे. लहान मुलं, वयोवृद्ध महिला आहेत, स्वत: महसूल प्रशासनाची माणसं आहोत. 60 ते 80 जण आहोत. या सर्वांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ इथे येणं गरजेचं आहे. नाहीतर आमच्या या सर्व लोकांच्या जीवितास हानी उद्भवू शकतो”, अशी भीती गावकऱ्याने व्यक्त केली.
“सीनाकाठी नदीचं रौद्ररुप निर्माण झालेलं आहे. प्रशासनाने हेलिकॉप्टरच्या मदतीने आम्हाला मदतकार्य करावं, अशी नम्र विनंती करतो. सीनाकाठच्या सगळ्या गावांमध्ये पाणी आहे. पूल पाण्यात गेली आहेत. गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जीव महत्त्वाचा आहे. सत्ता, संपत्ती वाहून गेली आहे. आम्हाला केवळ आमच्या जीवची पर्वा आहे. आम्हाला वाचवण्यासाटी प्रशासनाने सहकार्य करावं”, अशी विनंती व्हिडीओतील व्यक्ती करताना दिसत आहे.
गावकऱ्याचा व्हिडीओ पाहा:
लवकरच बोटीने रेस्क्यू केलं जाणार
या व्हिडीओनंतर आता महत्त्वाची माहिती मिळत आहे. करमाळा तालुक्यातील संगोबा मंदिरात अडकलेल्या 90 जणांचे बोटीच्या सहाय्याने थोड्या वेळात रेस्क्यू सुरू होणार आहे. इंदापूर आपत्ती व्यवस्थापन मदत पथक तिथे हजर झालं आहे. सीना नदीचा करमाळा तालुक्यातील संगोबा येथील आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पुराच्या पाण्याचा विळखा आहे. करमाळा तालुक्यातील सीना नदीला पूर आल्यानंतर संगोबा मंदिरात 70 ते 80 नागरीक आहेत.
सीना नदीला पूर आल्याने निलज पोथरे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या संगोबा येथील आदिनाथ महाराज मंदिरात 70 ते 80 नागरीक अडकले आहेत. नागरिकांबरोबर महसूल कर्मचारी अडकल्याचीदेखील माहिती आहे. हेलिकॉप्टर अथवा NDRF टीमच्या सहाय्याने वाचविण्याची मागणी मंदिरात अडकलेल्या नागरिकांनी केली आहे.

