• Tue. Sep 15th, 2026

लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव समितीपुढे – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 22, 2025
लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव समितीपुढे – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद




मुंबई, दि. २२ : लोकनाट्य/ तमाशा हे नाव संगीतबारी कला केंद्रासाठी न वापरण्याचे बंधन असावे, या तमाशा कलावंत संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी स्थापित झालेल्या समितीकडे पाठविण्यात यावा. या समितीने कलाकेंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबतचा निर्णय पुढील १५ दिवसात द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

तमाशा कलावंताच्या विविध प्रश्नासंदर्भात आज पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे, गृह विभागाचे उपसचिव अ.नि.साखरकर, अवर सचिव बाळासाहेब सावंत, अखिल भारतीय लोक कलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, सल्लागार खंडुराज गायकवाड, अविष्कार मुळे, किरणकुमार ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, शेषराव गोपाळ, आनंद भिसे, सुनिल वाडेकर उपस्थित होते.

राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यापूर्वीच घेतला आहे. या समितीची कार्यकक्षा वाढवून नावात बदल करण्याबाबत ही समिती उपाययोजना सुचवेल, असे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. त्याचबरोबर, या लोक कलावंतांना गावोगावी कला सादर करण्यासाठी विविध परवानग्यांची आवश्यकता असते. यासंदर्भातही या नियुक्त समितीने उपाययोजना सुचवून पुढील १५ दिवसात अहवाल देण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

0000

संजय ओरके/विसंअ/

 

 







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed