अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने नुकसानी पोटी परभणी जिल्ह्यासाठी तब्बल 128 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षीच्या मान्सूनमध्ये जून पासूनच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडू लागला होता. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये तब्बल 570 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 137 मिलिमीटर पाऊस पडला आहे. परभणी जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल 688 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आणि तो वार्षिक सरासरीच्या तब्बल 102% एवढा आहे.
अद्यापही पावसाळा आणखीन शिल्लकच आहे. पाऊस केवळ मोठ्या प्रमाणावरच पडला नाही तर काही भागात सतत पाऊस पडला. तर काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. ज्यामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले. ओढ्या, नाल्याला, नदीला पूर आला आणि त्या पुराच्या पाण्यामुळे देखील शेतीचे अतोनात नुकसान झाले. आणि शेतकऱ्यांचे खरिपाचे हाताशी आलेले पीक वाया गेले.
मधील दोन महिन्यापासून परभणी जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे चालू होते. या आधारावरच राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडून सरकारकडे करण्यात आली होती. आज राज्य सरकारने परभणी जिल्ह्यासाठी तब्बल 128 कोटी 55 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे.
परभणी जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदरील निधीचे वितरण हे सरकारने सुचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणेच विहित दराने ही मदत देण्यात येणार आहे.
कोणत्याही लाभार्थ्याला मदत देताना द्विवृत्ती होणार नाही याची तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घेण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आले आहेत. ज्या प्रयोजनासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करावा, असे देखील या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
“ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर संकट येते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात. यावर्षी देखील खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेले खरिपाचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्ह्यासाठी तब्बल 128 कोटी रुपयांचा निधी देऊन परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री या नात्याने आभार मानते”, असं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर सांगितले आहे.

