ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवरुन मनसे आक्रमक होताना दिसत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच मोर्चा काढणार असल्याची देखील घोषणा केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : “ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपशेल अपयशी ठरले आहेत. ते गेल्या दहा वर्षांपासून राज्यात विविध खात्यांचे मंत्री आहेत. तरीही ते ही कोंडी दूर करू शकले नाही, याचा अर्थ ते अपयशी ठरले”, असा आरोप मनसेचे अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत शनिवार, २० सप्टेंबर रोजी मनसेचा ‘ट्रॅफिक मोर्चा’ निघणार आहे. या मोर्च्याची रूपरेषा जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाधव यांनी शहरातील वाहतूक कोंडीवरुन प्रशासनालाही धारेवर धरले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजल्यानंतरच जड वाहने सोडण्याचे आदेश यंत्रणांना बैठकीत दिलेले असताना हे निर्देश पाळण्यात आले नाहीत, बाराच्या आधी ही वाहने ठाण्याच्या रस्त्यावर आली तर अशी वाहने आम्ही फोडू, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला.
ठाण्यात मागील दहा वर्षात कोणताही नवीन प्रकल्प तयार झालेला नाही. राज्य सरकारचा निधी जुन्याच बाबींवर खर्च होतो. शहराला मुख्यमंत्रीपद लाभले, त्यावेळी ठाण्याचे भले झालेले नाही. रस्ते चांगले झाले नाही, वाहतुकीची समस्याही सुटली नाही, अशीही टीका जाधव यांनी केली. अवजड वाहने बंद करुन वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी बाह्यवळण रस्ते पूर्ण करावे लागतील, असंही अविनाश जाधव म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदारसंघातच काम रखडले
ठाणे पूर्वेच्या सॅटिस प्रकल्पाचे काम पाच वर्षांपासून सुरु आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या’ कोपरी – पाचपाखाडी’ विधानसभा मतदारसंघातच हे काम सुरु असून त्यांच्याच मतदारसंघात ही परिस्थिती असेल, तर प्रशासन नेमके काय करते? असा प्रश्न अविनाश जाधव यांनी उपस्थित केला. शहरातील या कोंडीच्या विरोधात २० सप्टेंबर रोजी ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून तीन हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयावर सायंकाळी साडेपाच वाजता मनसेचा मोर्चा निघणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. मनसेच्या या मोर्चावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा