पुण्याच्या मकोका न्यायालयात बंडू आंदेकर आणि इतर आरोपींना आज हजर करण्यात आलं. यावेळी बंडू आंदेकर आणि इतर आरोपींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.
“आम्हाला अंघोळ करू देत नाहीत, ब्रश करून देत नाहीत, असं चार ते पाच दिवस झाले सुरू आहे. आम्हाला बेदम मारहाण केली आणि कागदावर सही करायला लावली. त्या कागदात काय लिहिलं आहे वाचू पण दिलं नाही”, असा आरोप आरोपींनी कोर्टात केला. यानंतर कोर्टने आरोपींना मूलभूत सुविधा द्यावे, अशी ताकीद पोलिसांना दिली आहे.
सरकारी वकील काय म्हणाले?
आरोपींना अटक केली आहे. शस्त्र कुठून आणले, कुणी पुरवले आर्थिक मदत कुणी केली याचा तपास करायचा आहे. यासाठी पोलीस कस्टडीची गरज आहे, असं सरकारी वकील म्हणाले. त्यावर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
आरोपींचे वकील काय म्हणाले?
“सुजल आणि अमन यांचा तपास झाला आहे. रिकवरी, डिस्कवरी झाली आहे. त्यामुळे आणखी पोलीस कोठडीची गरज नाही”, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. पकडलेल्या इतर आरोपींचे वकील म्हणाले, “केवळ चुलत भावाची फॅमिली असल्यामुळे अडकवलं जात आहे. लक्ष्मी आंदेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांचं वय जास्त आहे, त्यांना काही आजार आहेत, त्याचा कोर्टाने विचार करावा”. तसेच “तांत्रिक तपासासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. भारती विद्यापीठच्या गुन्ह्यात आमचा काही संबंध नाही. मग या गुन्ह्यात कसा असेल? शिवम, वनराजच्या, केसमध्ये प्रत्यक्षदर्शी असल्याने त्याच यात नाव घातलं आहे”, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
वृंदावनी वाडेकर काय म्हणाली?
“आम्हाला सुना, नातवंड सोबत असताना अटक केली, मारेकरी पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं, सूर्योदयानंतर अटक केली”, असं वृदावनी वाडेकर म्हणाली. तर अमन पठाण, सुजल मिरगू यांनी 4- 5 दिवस पोलिसांनी अंघोळ, ब्रश करू दिली नाही,असा आरोप केला.
बंडू आंदेकर न्यायालयात काय म्हणाला?
“तपास अधिकारी पोलीस अधिकारी शैलेश संखे हे कृष्णाला हजर व्हायला सांग नाहीतर गोळ्या घालतो अशी धमकी देतात”, असा आरोप बंडू आंदेकर यांनी न्यायाधीशांसमोर केला.
सुजल आणि अमन काय म्हणाले?
आरोपी सुजल आणि अमन यांनी देखील यावेळी कोर्टात मत मांडलं. “आम्हाला खूप मारहाण केली आणि कागदावर/जबाबावर सह्या घेतल्या, काय लिहिलं होत हे वाचू दिलं नाही”, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, मकोका न्यायालयाने सर्व आरोपींना तीन दिवसांची 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

