• Wed. Jul 29th, 2026

    अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 28, 2026
    अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करून बालकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

    मंत्रालयात नंदुरबार, अमरावती (मेळघाट), गडचिरोली, पालघर (वसई वगळून) आणि रायगड (कर्जत-१ व २) या पाच जिल्ह्यांमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा, आवश्यक उपकरणांची उपलब्धता तसेच जून २०२६ अखेरच्या बालपोषण स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त वर्षा लढ्ढा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, महिला व बालविकास विभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूर, अवर सचिव सरदार तसेच आयसीडीएसचे उपायुक्त विजय क्षीरसागर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “बालपोषणाच्या आढाव्यात बालकांचे वजन व उंची मोजण्याची कार्यक्षमता ९९ टक्क्यांहून अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. गंभीर तीव्र कुपोषण (SAM), मध्यम तीव्र कुपोषण (MAM), कमी वजन आणि खुंटलेली वाढ (Stunting) यासंदर्भात जिल्हानिहाय विश्लेषण करून ज्या भागांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे, त्या भागांसाठी विशेष कृती आराखडा तयार करावा. तसेच पायाभूत सुविधांच्या उर्वरित कामांसाठी पुढील तीन महिन्यांचा कालबद्ध कृती आराखडा तयार करून सादर करावा.”

    अंगणवाडी केंद्रांमध्ये आवश्यक सुविधांची शंभर टक्के उपलब्धता सुनिश्चित करणे, वीज व सौरऊर्जा सुविधांचा विस्तार करणे, आवश्यक उपकरणांची उपलब्धता वाढविणे तसेच महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्यातील समन्वय अधिक परिणामकारक करून कुपोषित बालकांच्या व्यवस्थापनाला गती देण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देशही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.यावेळी अंगणवाडी केंद्रांच्या इमारती, वीज व सौरऊर्जा सुविधा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहे, कार्यरत स्वयंपाकगृहे तसेच वजनकाटे, इन्फंटोमीटर आणि स्टॅडिओमीटर यांसारख्या आवश्यक उपकरणांच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

    पाचही जिल्ह्यांतील अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची शंभर टक्के उपलब्धता असल्याचे निदर्शनास आले. तसेच बहुतांश केंद्रांमध्ये स्वच्छतागृहे, स्वयंपाकगृहे आणि बालकांच्या वाढीचे मोजमाप करण्यासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मात्र, काही भागांमध्ये कायमस्वरूपी वीज जोडणी आणि सौरऊर्जा सुविधांच्या उपलब्धतेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचेही नमूद करण्यात आले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed