Nagpur News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संवेदनशीलतेचं दर्शन घडवून दिलं. नागपुरात उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणापूर्वी मंचावरुन खाली उतरले आणि त्यांनी एका व्हिलचेअर बसलेल्या आजींना नमस्कार केला.
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोले पेट्रोलपंप चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले. नागपूरच्या अमरावी रोड या ठिकाणी लोकार्पणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात दिवंगत माजी खासदार श्रीकांत जिचकर यांच्या मातोश्री सुलोचना जिचकर आणि श्रीकांत यांच्या पत्नी राजश्री जिचकर यांनी देखील विशेष उपस्थिती लावली होती.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना माहिती मिळाली. यावेळी राजश्री जिचकर यांना मंचावर बोलावण्यात आलं. त्यांचा मंचावर सन्मान करण्यात आला. तर सुलोचना जिचकर यांच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंचावरुन खाली उतरले. त्यांनी व्हिलचेअरवर बसलेल्या सुलोचना जिचकर यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुलोचना जिचकर यांचे पाया पडले. नितीन गडकरी यांनीदेखील नमस्कार केला. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी यांनी सुलोचना यांचा सत्कार केला. यावेळी श्रीकांत जिचकर यांच्या आई सुलोचना जिचकर यांच्या डोळ्यांत अश्रू आले. तसेच यावेळी सूत्रसंचालिकांकडून श्रीकांत जिचकर यांच्याविषयी माहिती दिली जात होती.
श्रीकांत जिचकर कोण होते?
श्रीकांत जिचकर हे भारताचे सर्वाधिक शिक्षण घेतलेले व्यक्ती होते. त्यांनी एबीबीएस, एमडीसह विविध अशा 20 विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. त्यांनी यूपीएससी परीक्षा दोनवेळा पास केली होती. ते आधी आयएएस बनले होते. त्यानंतर ते आयपीएस बनले होते. पण त्यामध्ये त्यांचं मन जास्त रमलं नाही आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते दोनवेळा आमदार आणि एकदा राज्यसभेचे खासदार राहिले होते. त्यांचं इतकं शिक्षण इतकं झालं होतं की लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झाली होती. अतिशय विद्वान राजनेता अशी त्यांची ओळख होती. सर्वात सुशिक्षित नेते अशी त्यांची ओळख होती. त्यांनी देशात आणि विदेशात आरोग्य, शिक्षण, धर्म या विषयांवर व्याख्यानं दिली होती. महाराष्ट्रातील शक्तीशाली नेत्यांमध्ये त्यांचं नाव होतं. पण 2004 मध्ये त्यांचं अपघाती निधन झालं होतं.

