C.P. Radhakrishnan : खासदार सी.पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्यांनी इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. राधाकृष्णन यांनी १५२ मतांनी विजय मिळवला. त्यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊया सोप्या शब्दांत
उपराष्ट्रपती म्हणून ते राज्यसभेचे अध्यक्षपद सांभाळतील आणि राष्ट्रपती अनुपस्थितीत कार्यवाहक राष्ट्रपतीची जबाबदारी पार पाडतील. साध्या स्वभावाचे, शांत आणि अनुभवी राजकारणी म्हणून त्यांची कार्यशैली नावाजली गेली आहे. RSS शाखेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून त्यांनी सातत्याने संघ-भाजपच्या कार्यात सक्रिय भूमिका निभावली आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDAचे उमेदवार राधाकृष्णन यांचा मोठा विजय; इंडिया आघाडीची मतं फुटली
वैयक्तिक पार्श्वभूमी
चंद्रपुरम पोनुसामी राधाकृष्णन यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुप्पूर, तामिळनाडू येथे झाला. लहानपणीच ते RSS मध्ये सक्रिय झाले. १९७४ मध्ये ते जनसंघाच्या कार्यकारिणीत दाखल झाले आणि तेथूनच त्यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास सुरू झाला.
संसदीय अनुभव आणि राजकीय वाटचाल
सी.पी. राधाकृष्णन हे दोन वेळा लोकसभा खासदार राहिले आहेत. १९९८ आणि १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी तमिळनाडूतील कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मात्र पुढील काही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही पक्षातील संघटनात्मक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या.
२००४ ते २००७ दरम्यान ते भाजप तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर २०१६ ते २०२० या काळात कोइर बोर्डचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कोइर उत्पादन आणि निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणली. नंतर २०२० ते २०२२ या काळात भाजपचे केरळ आंतरराष्ट्रीय प्रभारी म्हणूनही ते कार्यरत होते.
राज्यपाल पदावरील कार्यकाळ
फेब्रुवारी २०२३ मध्ये राधाकृष्णन यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली. या काळात त्यांनी तेलंगणा आणि पुड्डुचेरीचे कार्यवाहक राज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडली.

