मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने केलेल्या नियुक्त्यांमध्ये पश्चिम उपनगरात नाराजी उफाळून आली आहे. विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी, चारकोपमधील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, पक्षनेतृत्वावर आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप केला आहे.
शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास प्रभारी विभागप्रमुखांच्या नावांची यादी जाहीर केली. त्या यादीत नाव नसल्यानं पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी, चारकोपमध्ये नाराजी पसरली आहे. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात ठाकरेसेनेतून शिंदेसेनेत आलेले जितेंद्र जानावळे विभागप्रमुख पदासाठी इच्छुक होते. पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली आहे.
‘संघटन बांधणीची क्षमता असताना “विभागप्रमुख” पदासाठी मला का नेहमी डावलले जाते? तिकडे ही तसेच आणि इकडे ही असेच!’, अशा शब्दांत जितेंद्र जानावळे (J.J) यांनी त्यांची खदखद व्यक्त केली आहे. नव्या आदेशानुसार जानावळे यांच्याकडे विलेपार्लेच्या प्रभारी विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘आपल्याला पक्षात घेताना विलेपार्लेचे विभागप्रमुख पद देणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं होतं. पण तसं झालं नाही,’ अशा शब्दांत जानावळेंनी नाराजी बोलून दाखवली. मी शिवसेनेत ३० वर्ष काम केलं आहे. तो प्रदीर्घ अनुभव पाहता पार्ल्यात शिवसेना जोमानं उभी केली असती. पुनर्नियुक्त झालेल्या विद्यमान विभागप्रमुखांच्या हाताखाली आपण काम करणार नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
गोरेगाव आणि दिंडोशी विधानसभा मतदारसंघांच्या प्रभारी विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्यानं गणेश शिंदे नाराज आहेत. ते वेगळा विचार करु शकतात. ‘ठाकरेसेनेशी संघर्ष करत गेल्या तीन वर्षांत पक्ष उभा केला. शिंदे यांनी बंड केल्यापासून त्यांना साथ दिली. ठाकरेंची साथ सोडताना विभागप्रमुखपदी नियुक्तीचं आश्वासन देण्यात आलं होतं. पक्षानं न्याय न दिल्यास शेकडो कार्यकर्त्यांसोबत शेकडो कार्यकर्त्यांसोबत वेगळी वाट निवडू,’ अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे.

