Akola Accident : गणेश विसर्जन करून परतणाऱ्या भाविकांना पातूर-अकोला रस्त्यावर एक भीषण रस्ता अपघात झालाय. या अपघातात अकोल्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.
भक्तिभावाने 10 दिवस गणपती बाप्पांची पूजा अर्चा केल्यानंतर आज निरोप द्यायचा दिवस होता. मात्र नियतिने वेगळाच डाव मांडला होता. अकोल्यातील दोन गणेश भक्त कापशी येथील तलावात गणेश विसर्जनासाठी गेले होते. गणेश विसर्जन करून दोघे मित्र मोटरसायकलने घरी परतत असताना समोर येणाऱ्या कारची धडक लागली आणि अपघातात एकाच मृत्यू झाला तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र आंधळे आणि त्याचा मित्र विक्की माळी गणेश विसर्जनासाठी अकोला शहरापासून जवळच असलेल्या कापशी तलावावर गेले होते. गणेश विसर्जन करून परतताना कारने धडक दिली. त्यात रामचंद्र आंधळेचा मृत्यू झाला, तर विक्की माळी गंभीर जखमी झाला आहे.
Dhananjay Munde : बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही समता आहे का? धनंजय मुंडेंचा रोकडा सवाल
अकोला ते पातूर मार्गावर काही दिवसांपूर्वी उड्डाणपूल तयार करण्यात आले आहे. रस्त्यावरील गावांसाठी सर्व्हिस रोडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कापशी गावातून एका बाजूचा सर्व्हिस रोड अजूनही प्रलंबित आहे. हा सर्व्हिस रोड नसल्यानं वाहनचालक विरुद्धदिशेनं वाहने काढतात, त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघात झाले आहेत. आज रामचंद्र आणि त्याच्या मित्राचाही असाच अपघात झाला. दोघेही विरुद्धदिशेने नसते तर हा अपघात घडला नसता. पण सर्व्हिस रोडच नसल्याने नाईलाजाने वाहन चालकांना तशी वाहनं चालवावी लागतात. हा सर्व्हिस रोड व्हावी ही मागणी अनेक दिवसांपासून धूळ खात आहे. पण अजूनही सर्व्हिस रोड संदर्भात कुठलीही हालचाल दिसत नाही. पोलिस या अपघात प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

