Pune Gangwar : पुणे ऐन गणेशोत्सवात गोळीबाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे टोळी युद्धातून ही हत्येची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नाना पेठेत गोळीबार झालाय. या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या खुनाच्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा खून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे नुकतंच पोलिसांनी हे टोळीयुद्ध उधळून लावलं होतं. पण तरीही गुन्हेगारांना रोखण्यात पोलिसांनी यश आलं नाही. पुण्यात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे. उद्या गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. उद्या मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका शहरातून निघतील. असं असताना पुण्यातील नाना पेठेत एका तरुणावर तीन गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या खुनाच्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी नुकताच हत्येचा डाव उधळलेला
विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी नुकताच हत्येचा डाव उधळला होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची एक वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रविवारी तयारी करण्यात आली होती. पण पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी वॉच ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळत अटक केली होती. पण त्याचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पोलीस त्याचा शोध घेत होते. या दरम्यान, आज हत्येची घटना घडली. पोलिसांकडून उद्याच्या गणेशोत्सवाची तयारी केली जात आहे. असं असताना नाना पेठेत अचानक हत्येची घटना घडली. आता या प्रकरणातील आरोपींचा शोध घेणं हे पुणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.
‘या’ दोन टोळ्यांमध्ये वैर शिगेला
पुण्यात गुंड बंडू आंदेकर टोळी विरुद्ध सूरज ठोंबरे टोळी असं वैर वाढलं आहे. हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. आंदेकर टोळीने 2023 मध्ये ठोंबरे टोळीचे शुभम दहिभाते आणि निखिल आखाडेवर नाना पेठेत हल्ला केला होता. या हल्ल्यात निखिल आखाडेकर याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ठोंबरे टोळीत संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी ठोंबरे टोळीने आंदेकर टोळीचा ‘बॅकबोन’ म्हणून ओळख असलेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या केली होती. नाना पेठेतील तालीम परिसरात वनराज यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न नुकताच रविवारी करण्यात आला होता. पण आरोपींचा तो डाव फसला होता. पण आज पोलीस गणपती विसर्जनासाठी कामात व्यस्त असल्याची संधी साधत आरोपींनी डाव साधला. या हल्ल्यात तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे.

