Manoj Jarange Patil : हैदराबाद गॅझेटनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास मंडल आयोगाला आव्हान देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मराठ्यांनी विजय मिळवला असल्याचाही पुनरुच्चार जरांगेंनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आम्ही ओबीसीत घुसखोरी करत नाही. तर अधिकृत आरक्षणात येत आहोत. छगन भुजबळांना चांगलं माहीत होतं मराठे आरक्षण घेणार. आम्ही मुंबईत गेलो, विजय घेऊन परत आलो. भुजबळ यांचा विरोध बघता मराठ्यांनी ओळखायचं की ,आपण मराठे जिंकलो आहे. छगन भुजबळ आता शक्यतो ओबीसी नेता असलेली ओळख मिटू देणार नाही. त्याच्यापेक्षाही खूप मातब्बर नेते आहेत. समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो. उद्या त्या नेत्यांचे कसे नाक कापायचे, असं करून तो बाजूला सरकवतो. भुजबळ मरायला टेकला जरी तरी त्याच्या अंगातील खोड जाणार नाही, अशी बोचरी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.
आंबेडकरांनी किती वेळा टोले हाणावे?
प्रकाश आंबेडकरांना जाऊ द्या त्यांना मी मानतो. आंबेडकर अभ्यासू आहेत. छत्रपती, आंबेडकर वंशजांबद्दल मी बोलत नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात. मात्र किती वेळ खोचक टोले हाणावे अन् किती वेळ समोरच्या समाजाने सहन करावे? तरीही आम्ही दोन्ही घराण्याबद्दल बोलत नाही. त्यांनी समजून घेतलं पाहिजे, पण त्याला नाईलाज आहे. प्रकाश आंबेडकर कितीही काही म्हणाले, तरी मराठे ओबीसी आरक्षणाकडे घेऊन गेलोच असे जरांगे म्हणाले.

