• Sat. Mar 7th, 2026
    मराठ्यांच्या मागण्या मान्य, जरांगेंचं उपोषण मागे, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचं अभिनंदन केलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर उपोषण मागे घेतलं आहे. जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “मनोज जरांगे यांचं आदोलन त्यांनी मागे घेतलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती. पण त्यातील महत्त्वाचा विषय होता की, मनोज जरांगे यांची सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी होती. त्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाहता अशाप्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

    “विशेषत: आपण लक्षात घेतलं पाहिजे की, ही वस्तुस्थिती त्यांच्याही लक्षात आणून देण्यात आली. मंत्रिमंडळ उपसमितीच्या टीमने त्यांच्याही लक्षात आणून दिलं. आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समुहाला नसतं तर व्यक्तीला असतं. त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं. म्हणूनच अशाप्रकारे सरसकट करता येणार नाही. ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही. त्यांनीदेखील काल ती भूमिका समजून घेतली आणि स्वीकारली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    “त्यांनी सांगितलं की, कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करु नका. त्यातून हा स्टेलमेंट मागे झाला. पुन्हा त्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने चर्चा केल्या. जीआर काढला. त्यामध्ये जे बदल हवे होते ते केले. तो जीआरदेखील जाहीर झाला आहे. त्यासोबतच इतर मागण्या होत्या. त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केल्या आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    “मला पहिल्यांदा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि समितीमधील मंत्र्यांचं अभिनंदन करायचं आहे. त्यांनी सातत्याने बैठका घेऊन चर्चा करुन मार्ग काढला आहे. हा मार्ग निघाल्यामुळे मराठवाड्यात राहणाऱ्या आमच्या मराठा समाजाच्या लोकांना, ह्यांना कधीकाळी रक्तनात्यातील लोकांचा कुणबी म्हणून उल्लेख असेल तर त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. हैदराबाद गॅझेटियरमुळे ते सोपं होणार आहे. फॅमिली ट्री इस्टॅब्लिश करुन आरक्षण दिलं जाणार आहे. ज्यांना अशाप्रकारचे पुरावे मिळेल ते सगळ्यांना आरक्षण मिळेल”, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

    ‘अतिशय चांगला निर्णय’

    “ओबीसी समाजाला भीती होती की, सरसकट सगळे अशाप्रकारे आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही ते देखील आरक्षण घेतील. तसेच इतरही समाजाचे ज्यांना आरक्षण नाही ते देखील आरक्षण घेतील. तशाप्रकारे आता होणार नाही. ज्यांचा खरा क्लेम आहे, पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या नागरिकांना आता आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय झाला”, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

    “हा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यासाठी महत्त्वाचा होता. कारण मराठवाड्यात रेकॉर्ड नाहीयत. आम्ही एक संविधानिक तोडगा काढू शकलो आहोत. हे आरक्षण कोर्टातही टिकेल. मी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यावर समाधानी आहोत. त्यांनी उत्तम काम केलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. या सगळ्या दरम्यान मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. त्या निमित्ताने मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा