Devendra Fadnavis : मुंबई हायकोर्टाने मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकार कोर्टाच्या निर्देशांनुसार कारवाई करेल, अशी माहिती दिली.
“मी प्रवासात असल्याने कोर्टात नेमकं काय म्हटलं आहे ते मी ऐकलेलं नाही. पण मला जे समजलं आहे त्यानुसार कोर्टाने हे सांगितलं आहे की, जी काही परवानही होती ती काही अटी-शर्तींसह होती. त्यांचं उल्लंघन झालेलं आहे. विशेषत: रस्त्यावर ज्या काही गोष्टी सुरु आहेत त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाने काही निर्देश दिले आहेत. कोर्टाने दिलेल्या निर्देशांचं पालन करणं हे सरकारला क्रमप्राप्त आहे. प्रशासन कोर्टाच्या आदेशांचं उचित पालन करेल”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
“मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकीत आम्ही सगळ्या लीगल ऑप्शनचा विचार केला. त्यानंतर जे काही मार्ग काढण्यात येतील तेव्हा ते कोर्टाच्या अख्यारीत कसे बसतील याबाबत काही चर्चा झाली. त्याबाबत काही अधिकची माहिती मागवली आहे. ती माहिती आल्यानंतर आम्ही पुन्हा चर्चेला बसलो होतो. या संदर्भात एकदा जे काही मार्ग काढायचे आहेत ते कायदेशीर मार्ग काढायचे आमची मानसिकता आहे. त्यावर आमचं काम सुरु आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“मला असं वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. पत्रकारांवर हल्ला, विशेषत: महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी आंदोलनाला गालबोट लावणारं आहे. आपण 30 पेक्षा जास्त मराठा मोर्चा बघितले आहेत. त्या मोर्चातील शिस्त बघितली आहे. मला असं वाटतं त्या मोर्चांनंतर सरकारने घेतलेले सकारात्मक निर्णयही आपण त्या काळात बघितले आहेत. पत्रकार, महिला पत्रकार आपलं काम करत असतात. ते लोकशाहीत तुमची भावनाच पोहोचवत असतात. असं असताना त्यांच्यावर हल्ला होणारं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, हे अशोभनीय आहे, याचा सगळ्याच स्तरावर निषेध झाला पाहिजे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
“शेवटी उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सरकारचा प्रयत्न हा सामंजस्याने गोष्टी व्हायला पाहिजेत. पण आता सर्वोच्च न्यायलायने निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासन ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे त्या प्रकारची कारवाई केली जाईल”, अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

