• Sun. Mar 8th, 2026

    ’13 महिन्यांपासून वेळ दिला, आता एक मिनिटही देणार नाही’, मनोज जरांगे यांनी न्यायमूर्तींना सुनावलं

    ’13 महिन्यांपासून वेळ दिला, आता एक मिनिटही देणार नाही’, मनोज जरांगे यांनी न्यायमूर्तींना सुनावलं

    मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती आझाद मैदानात दाखल झाली. या समितीने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी वेळ वाढवून मागितली. पण मनोज जरांगे यांनी एक मिनिटही मिळणार नाही, असं ठणकावलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. हजारो मराठा मुंबईच्या आझाद मैदान येथे एकवटले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे मुंबईत आलेल्या आंदोलकांचे हाल होत असल्याचा देखील दावा केला जात होता. अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती आझाद मैदानात दाखल झाली आहे. या समितीकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी वेळ हवा आहे, अशी मागणी न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे केली. पण मनोज जरांगे यांनी वेळ देण्यास विरोध केला. “आम्ही 13 महिन्यांपासून वेळ दिला होता. आता एक मिनिटही देणार नाही”, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी न्यायमूर्तींना सुनावलं.

    पुढच्या शनिवारी-रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही, जरांगेंचा इशारा

    मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण मनोज जरांगे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आधी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढा आणि त्यानंतर प्रक्रिया करायला घ्या, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. तसेच मनोज जरांगे यांनी सरकारला सहा दिवसांचा अल्टिमेटम दिलं आहे. सातारा आणि हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार तातडीने जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. याबाबत तात्काळ निर्णय घेतला नाही तर पुढच्या शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाहीत, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.बॉम्बे आणि औंध संस्थानच्या गॅझेटियरसाठी वेळ देतो. पण पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा आणि हैदराबादच्या गॅझेटियरसाठी एक मिनिटदेखील वेळ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

    (सविस्तर बातमी अपडेट होत आहे)

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा