Ganeshotsav Special Train : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला. मध्य, पश्चिम, दक्षिण रेल्वेने ३८० विशेष गाड्या चालवल्या, तरी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यातच, तेजस आणि मांडवी एक्स्प्रेस गाड्यांना झालेल्या विलंबामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक स्थानकांवर उद्घोषणा वेळेवर न झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेस सीएसएमटीहून गुरुवारी पहाटे ५.५० मिनिटांनी रवाना होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ही एक्स्प्रेस साडेतीन तास विलंबाने अर्थात ९.२२ वाजता सुटली. गाडी क्रमांक १०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी ७.४५ वाजता येणे अपेक्षित असताना सव्वा तास विलंबाने धावली.
मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फलाटांवर तसेच आसनांवर पाणीच पाणी झाले होते. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बसणे आणि बॅगा ठेवणे गैरसोईचे झाले. ठाणे स्थानकात गाडी विलंबाने असल्याची उद्घोषणा होत नव्हती. गाडीची वेळ निघून गेल्यावर पाऊण तासानंतर विलंबाची उद्घोषणा करण्यात आली. यामुळे सीएसएमटीसह दादर, ठाणे, पनवेलमधील प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला, अशी प्रतिक्रिया प्रवासी निशांत मोरे यांनी दिली.
नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टिम (एनटीईएस) ॲपनुसार तेजस एक्स्प्रेस मडगावला गुरुवारी सायंकाळी ५.२० वाजता पोहोचणे अपेक्षित होते. विलंबामुळे गाडीचा प्रवास पूर्ण होण्यासाठी रात्री ११.१९ ची वेळ दाखवण्यात आली. मांडवी, तेजस एक्स्प्रेस विलंबाने धावल्याने मुंबई-कोकण मार्गावर धावणाऱ्या विशेष फेऱ्यांवर त्याचा परिणाम झाला. यामुळे अन्य रेल्वेगाड्याही विलंबाने धावत्या होत्या. यामुळे गणरायाच्या आगमनानंतर नियमित आणि विशेष रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

