सिडको : जीवघेण्या अपघातात दुचाकीवर वडिलांच्या पाठीमागे बसलेला मुलगा बचावला, पण त्याच्या डोळ्यांसमोरच वडिलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक दुर्घटना नाशिकमधील सिडको येथील राजे संभाजी स्टेडियमसमोर गुरुवारी दुपारी घडली.
दुपारी साडेतीनच्या सुमारास के, के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजची बस (एमएच १५, एके १०३८) कॉलेजमधून विद्याथ्यर्थ्यांसह घेऊन चालक दिलीप गंगाधर गांगुर्डे (४८, जेलरोड) पाथर्डी फाटा येथून राजे संभाजी स्टेडियमकडे जात असताना अचानक बसचे ‘ब्रेक फेल’ झाले. त्यामुळे पुढील दुचाकीला बसने जोरदार धडक दिली. त्यामुळे ही दुचाकी समोरील आयशर ट्रकवर वेगाने आदळली.
त्यात दुचाकीचालक सुरेश अनपट यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागला आणि अतिरक्तस्राव होऊन ते जागीच ठार झाले. दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा मुलगा उमेशचा पाय फ्रॅक्चर झाला. मात्र, डोळ्यासमोरच वडिलांचा मृत्यू झाल्याने त्याला मोठा धक्का बसला. या अपघातात बसचालक आणि पाच ते सहा विद्यार्थ्यांना कोणतीही इजा झाली नाही. दुचाकीचे मोठे नुकसान झाले, तर बस आणि आयशरचे किरकोळ नुकसान झाले.
या अपघातानंतर नागरिकांनी स्थानिक रुग्णवाहिका मिळविण्यासाठी धावाधाव केली. मात्र, वेळेत रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला, तोपर्यंत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. बाळा दराडे व इतरांनी पोलिसांच्या वाहनातून जखमी मयूर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या अपघातामुळे येथे वाहतूक कोंडी झाली होती. या अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मराठा आंदोलक चाकणमध्ये दाखल
हलगर्जीपणाने निष्पापांचा बळी
शहरातील बहुसंख्य शाळा-महाविद्यालयांच्या स्कूल बस, तसेच खासगी बसची वेळोवेळी दुरुस्तीची कामे केली जात नाहीत. त्यामुळे ‘ब्रेक फेल’ होऊन अपघातांच्या घटना घडत आहेत. केवळ हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असतानाही संबंधित यंत्रणा ढिम्मच आहेत. त्यामुळे या अपघाताला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
