• Wed. Mar 11th, 2026

    धो-धो पावसात मोनो रेलमध्ये बिघाड होऊन ५८२ प्रवासी कोंडलेले ;अधिकाऱ्यांना दिला दणका

    ByMH LIVE NEWS

    Aug 27, 2025
    धो-धो पावसात मोनो रेलमध्ये बिघाड होऊन ५८२ प्रवासी कोंडलेले ;अधिकाऱ्यांना दिला दणका

    मुंबई-अनुप फंड 

    मुंबईत मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा रस्ते मार्गासह रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता. पावसाचं पाणी रेल्वे ट्रॅकवर साचल्याने लोकल वाहतूक बंद पडली होती. तसंच रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं होतं. अशात सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांनी आपलं घर गाठण्यासाठी मोनो रेलचा पर्याय निवडला. मोनो रेलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आणि याच गर्दीवेळी मोनो रेलचा एका बाजूला झुकली. याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. गाडी मध्येच थांबून प्रवासी अडकल्याच्या घटनेबद्दल मोनो रेलमधील दोन अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा उच्चपदस्थ अधिकारी तपास करणार आहेत. १९ ऑगस्टला ही घटना घडली होती.धो-धो पाऊस सुरू असताना मोनोरेलमधील भार वाढल्याने गाडी सिद्धार्थनगर स्थानकाच्याबाहेर मध्येच थांबल्याची घटना १९ ऑगस्टला घडली होती. गाडीतील दिवे व वातानुकुलित यंत्रणा बंद होऊन प्रवाशांचे हाल झाले होते. मोनोरेलला दोन्ही बाजूला दरीसारखी स्थिती असल्याने व त्यातून ही गाडी वळणावर बंद पडल्याने आत अडकलेल्या तब्बल ५८८ प्रवाशांना काचा फोडून व दरवाजे तोडून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले होते. यामध्ये गाडीचे अभूतपूर्व नुकसान झाले.
    या संपूर्ण घटनेचा ही मार्गिका चालविणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तपास सुरू केला होता. या तपासाअंती दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मोनोरेलचे मुख्य अभियंता (सिग्नल व दूरसंचार) व मार्गिकेचे परिचालन करणाऱ्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापक (सुरक्षा) या दोन पदावरील उच्चाधिकाऱ्यांचा या निलंबनामध्ये समावेश आहे. या प्रकरणाचा विस्तृत तपास करण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्थापन केली आहे.

    मुंबईतील पावसामुळे खोळंबलेली मध्य रेल्वे कधी सुरू होणार? समोर आली महत्त्वाची माहिती

    एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार हे समितीचे अध्यक्ष आहेत. आयआयटी मुंबईचे प्रा. हिमांशू बहिरट, सिडकोच्या मुख्य वाहतूक नियोजक गीथा पिल्लई व एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त आस्तिक पांडे हे समितीचे सदस्य आहेत. या संपूर्ण घटनेच्या प्रत्येक बाबींचा तपशीलवार तपास करण्याची सूचना या समितीला देण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed