Nagpur Ganapati News : महाराष्ट्रातील गणपतीची सर्वात मोठी मूर्ती साकारली गेली आहे. लालबागच्या राजापेक्षाही या गणपतीच्या मूर्तीची उंची अधिक आहे. कुठे आहे हा बाप्पा आणि कोणी साकारला जाणून घ्या.
लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आपलाच देखावा भव्यदिव्य असावा याची स्पर्धा मंडळांमध्ये लागली आहे. स्थानिक कारागीरांच्या सहभागातून महाराष्ट्रातील सर्वांत उंच मूर्ती बनविण्यासाठी राजकुमार गुप्ता यांनी पुढाकार घेतला. चितारओळीतील मूर्तीकार विजय वानखेडे या प्रमुख मूर्तीकारांच्या मार्गदर्शनाखाली गोलू सूर्यवंशी, मुन्ना काशिकर, सुदेश पाटणकर, देवेंद्र शेंडे या मूर्तीकारांनी ही मूर्ती तयार केली. वानखेडे यांना १९ वर्षांपासून मूर्ती तयार करण्याचा अनुभव आहे. ही पूर्णपणे मातीची मूर्ती आहे. मूर्तीवर अंतिम हात फिरविणे सुरू आहे. व्हाइट बंगला परिसरातील ग्रामीण पोलिस विभागाच्या जागेवर ही मूर्ती साकारण्यात आली. या ठिकाणी खुली जागा असल्याने गणेशोत्सवातील पुढील १० दिवस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मनोरंजनासाठी झुलेही बसविण्यात आले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
फडणवीसांच्या ‘होम ग्राऊंड’वर भाजपची ‘नो रिस्क पॉलिसी’; नागपुरात कशी आहे भाजपची रणनीती?
असे लागले साहित्य
- -ही मूर्ती साकारण्यासाठी ६०० किलो माती लागली
- -ही माती भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथून आणण्यात आली.
- -३०० पेंड्या तनस लागले.
- -३ हजार फूट आकाराचे लाकडाचे बत्ते यासाठी लागले.
- -२० मिटर कापड लागला
- -१५ मिटर दुपट्टा
- -१०० पोती लागली (बारदाना)
- -गणपतीला बसण्यासाठी १० मिटरचे आसन तयार करण्यात आले आहे
- -हार, बाजूबंद, झुमके, कडे, स्टोन, लेस, मुकूट असा श्रृंगार करण्यात येत आहे.
- -बाप्पांच्या मूर्तीप्रमाणे मुकूटही ८ फुटांचा आहे.
- -रंग २० लिटर आणि पुटींगच्या १० बॅग
प्रवेशद्वारावरही सहा फुटांचा गणपती
५१ फुटी गणपती बनविल्यानंतर प्रवेशद्वारावरही ६ फुटांचा वेगळा गणपती विराजमान होणार आहे. मंगळाला भेट देण्यासाठी येणारे भक्त या गणपतीचीही पूजा करतील. १० दिवस गणेशभक्तांचे मनोरंजन करण्यासाठी विविध उपक्रम येथे आयोजन करण्यात आले आहे. भव्यदिव्य बाप्पांसाठी भव्य उंदीरही साकारण्यात आला आहे. या उंदिराची उंची ४ फूट आहे.
Ajit Pawar : ‘प्रत्येक वेळी सत्ता असेल तरच काम होत नाही, संबंध महत्त्वाचे…’ अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला, चर्चांना उधाण
जागेवरच विसर्जन
एवढा मोठ्ठा गणपती बनविल्यानंतर विसर्जन कुठे करणार, हा प्रश्नही अनेकांना पडला. मात्र त्याचीही व्यवस्था मंडळाने केली. मूर्तीच्या आतमध्ये पाइप बसविण्यात आले आहे. याचबरोबर वर शॉवरही लावण्यात आले आहेत. ८ मोटरच्या साहाय्याने हे पाण्याचे फवारे सोडण्यात येईल. त्यामुळे ज्या ठिकाणी बाप्पा विराजमान झाले तिथेच विसर्जन करण्यात येईल, असे आनंद गुप्ता यांनी सांगितले.

