राहुल पाटील देखील भाषणात बोलताना आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत म्हणाले की, ‘पी. एन पाटील साहेबांनी ज्या निष्ठेने काम केलं त्याच निष्ठेनं आम्ही राष्ट्रवादीसोबत प्रामाणिकपणे पुढे जात आहोत. त्यामुळे सगळी जनता देखील तशाच प्रेमाने आणि त्याच ताकदीने सोबत राहील.’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, ‘पी. एन. पाटील साहेबांचं निधन झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना सांत्वनालाही वेळ मिळाला नाही. मात्र, अजित पवारांनी घरी येवून सांत्वन केलं’, अशी खदखदही राहुल पाटलांनी बोलून दाखवली.
कोल्हापुरातील राजकीय समीकरणे
अजित पवार म्हणाले, ‘बाभूळगाव आणि सडोली खालसा यांचे जुने राजकीय संबंध महाराष्ट्राने पाहिलेत, आता सडोली खालसा आणि काटेवाडी यांचं नवं नातंच संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे’. तर याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होणार असल्याचा विश्वास देखील अजितदादांनी दाखवला आहे.
शेतकरी, तरुण-तरुणींचे कल्याण
भाषणात बोलताना अजित पवार म्हणालेत की, ‘शेतकरी, तरुण-तरुणी राज्याच्या विकासासाठी मागे राहू नयेत. आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारसरणीला जोडून सत्तेत आहे. शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे’. तसेच, ‘कर्ज भरणारे शेतकरी कोल्हापुरात आघाडीवर आहेत. याआधी दोनवेळा कर्जमाफी झाल्यानंतर कर्ज भरणारा शेतकरी म्हणू लागला की, आम्ही कर्ज भरून चूक केली काय? त्यामुळे आर्थिक शिस्त पाहिजे,’ असंही अजितदादा कर्जमाफीबाबत बोलताना म्हणाले आहेत.
विरोधकांवर टीका
अजित पवार यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर टीका करताना म्हटलंय की, ‘विरोधकांकडे काही मुद्दा नसल्यामुळे ते घोटाळ्याचे आणि मतचोरीचे आरोप करतात, ते लोकांची दिशाभूल करीत आहेत. पराभव झाला म्हणून विरोधक अनेक घोटाळ्यांबद्दल खोट बोलत आहेत. खोट बोल पण रेटून बोल अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. मात्र मतदारांना आमच्याविरोधात उभे करण्यात विरोधक यशस्वी होणार नाहीत,’ असं देखील अजितदादांनी ठामपणे सांगितलं आहे.
कार्यकर्त्यांकडे विशेष आवाहन
दरम्यान, उपस्थित कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत अजित पवार यांनी पी. एन. पाटील यांची आठवण काढली. ते म्हणाले की, ‘पी. एन. पाटीलवरुन आपल्याला बघत आहेत. कार्यकर्ता कुठही चुकता कामा नये. दिवसा एक आणि रात्र एक असा प्रयत्न चालणार नाही. कार्यकर्त्यांनी कठोर आणि स्थिर राहायला पाहिजे,’ असं म्हणत अजितदादांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं.
