Akola Pola Festival Youth Drowns to Death : शेतकऱ्यांच्या सणाला म्हणजे पोळ्याच्या सणाला अनेक जिल्ह्यात गालबोट लागला. अशीच एक हृदयद्रावक घटना अकोल्यात घडली आहे. पोळा आहे म्हणून शंतनू आपल्या बैलांना नदीवर धुवायला घेऊन गेला. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नकळत तो आत गेला. त्याने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण पाण्याच्या प्रवाहामुळे तो वाहून गेला अन् त्याचा करुण अंत झाला.
शेतकऱ्यांचा महत्वाचा सण म्हटलं की साहजिकच पोळा सणाचं नाव समोर येत. कारण वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. या दिवशी शेतकरी सकाळीच बैलाला नदीवर धुण्यासाठी घेऊन जातात. त्याला छान सजवतात आणि गावभर मिरवतात. पण याच दिवशी एखादी घटना घडणं म्हणजे दुर्दैव आहे. याच दिवशी २५ वर्षीय तरुणावर काळाने घाला घातल्यानं, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
फडणवीसांच्या ‘होम ग्राऊंड’वर भाजपची ‘नो रिस्क पॉलिसी’; नागपुरात कशी आहे भाजपची रणनीती?
नेमकं काय घडलं?
अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील खोळद येथील शंतनू अविनाश मानकर (वय २५) हा सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान आपल्या बैलांना पिढी नदीकाठावर धुण्यासाठी घेऊन गेला होता. पोळा सणानिमित्त बैलांना चारण्यासाठी व त्यांची अंघोळ घालण्यासाठी तो नदीकडे गेला असताना अचानक पुराच्या पाण्याचा जोर वाढला आणि शंतनू याला पाण्याच्या प्रवाहाने ओढून नेलं. शंतनूने बचावाचा प्रयत्न केला पण प्रवाहाचा वेग जास्त असल्याने काळाने घाला घातला. शंतनूचे बैल नदी काठावर हंबरत राहिले पण नियतीला काही औरच मान्य होतं. शंतनू हा अविनाश किसनराव मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता. तो गावात व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. अचानक घडलेल्या या घटनेनं मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Devendra Fadnavis : ‘तुमच्यामुळे आमचं सरकार, पुढील पाच वर्ष…’; लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
प्रशासनाने तातडीने धाव घेतली
दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळताच मूर्तिजापूर येथील तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिस व प्रशासन यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील आवश्यक कार्यवाही सध्या सुरू आहे. पोटचा लेक गेल्यानं आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला.

