Rana Patil on election Fraud : धाराशिवच्या तुळजापूरमध्ये 6 हजारांहून अधिक बोगस मतदार नोंदणी अर्ज दाखल झाल्याचा मोठा आरोप करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन 10 महिने उलटले तरी तपास संथगतीने सुरू आहे, असा आरोप खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी केला आहे. यावर आता आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राणाजगजीतसिंह पाटील नेमकं काय म्हणाले?
राणाजगजीतसिंह पाटील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हटलं की, बोगस नोंदणी प्रकरणाची चौकशी होत आहे आणि ती व्हायलाच हवी त्याचबरोबर, ती प्रक्रिया देखील सुरू आहे. हा विषय योग्य पद्धतीने हाताळाला जायला हवा, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
भारतीय लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर धाराशिव जिल्ह्याचे खासदार यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल 6 हजारांहून अधिक बोगस मतदार नोंदणी अर्ज दाखल झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतरही, 10 महिने उलटून गेले तरी तपासाचा ठसा नाही. राजकीय दबावाखाली ही गंभीर फसवणूक गुपचूप दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
कसा उघड झाला प्रकार?
दरम्यान, मतदार यादीच्या चावडी वाचनावेळी हा प्रकार उघड झाला आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील तब्बल 100 मतदान केंद्रांवर ही धक्कादायक फसवणूक उघड झाली होती.
बोगस मतदार नोंदणी संदर्भात ऑक्टोबर 2024 रोजी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या फिर्यादीत बोगस आधारकार्ड, खोटे फोटो, बनावट कागदपत्रे वापरून 6000 पेक्षा जास्त मतदार नोंदणी अर्ज दाखल करण्यात आल्याचा उल्लेख देखील केला होता.
आयोगालाच न्याय नाही-ओमराजे निंबाळकर
या प्रकरणात निवडणूक आयोगाचेच अधिकारी फिर्यादी आहेत. तरीदेखील त्यांनाच न्याय मिळत नाही, आरोपी शोधले जात नाहीत, यावरून प्रकरण किती गंभीर आहे याची कल्पना येते. “राज्याचे मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोग यावर काही कारवाई करणार आहेत की नाही, याची माहिती जनतेला दिली पाहिजे. अन्यथा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास डळमळीत होईल,” अस ओमराजे निंबाळकर म्हणाले. याचबरोबर, देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना निंबाळकर यांनी होत असलेल्या दिरंगाईबाबत लक्ष वेधण्यासाठी पत्र लिहिले आहे.

