Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शिक्षकाने इतिहास विषयाचा अभ्यास न केल्यामुळे विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. करीम शहा नावाच्या शिक्षकाने विद्यार्थ्याला कमरेवर, पायावर आणि गुप्तांगावर लाथा-बुक्क्यांनी तसेच दांडक्याने मारले, ज्यामुळे त्याच्या अंगावर व्रण उठले. पालकांनी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
करीन शहा असं मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निशांत (नाव काल्पनिक) हा वाळूज परिसरात असलेल्या राजश्री प्राथमिक विद्यालयामध्ये सातवीच्या वर्गात आरटीई अंतर्गत शिक्षण घेतो. तो १९ तारखेला शाळेत गेला, तेव्हा शाळेतील शिक्षक करीम शहा यांनी निशांतला इतिहासाचा होमवर्क का केला नाही, असे विचारत वर्गाच्या बाहेर काढले. त्याला बाहेर उभा करून हाता पायावर बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर दांडुक्याने मुलाच्या पार्श्वभागावर देखील बेदम मारहाण करण्यात आली.
शाळेतून घरी आल्यानंतर निशांतने हा संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला. करीम सर हे गेल्या दोन महिन्यांपासून मला त्रास देत असून शारीरिक व मानसिक छळ करत आहे, असे विद्यार्थ्याने पालकांना सांगितले. याबाबत शाळेच्या संस्था चालकांजवळ देखील तक्रार करण्यात आली. मात्र या शाळेमध्ये आरटीईच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे पालकांच्या लक्षात आले. या गंभीर प्रकारानंतर पालकांनी तात्काळ वाळूज पोलीस ठाणे गाठत मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा पुढील तपास वाळूज पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शिक्षकांच्या या वर्तनाचा जाहीर निषेध करण्यात आला. त्याचबरोबर शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अनेक पालकांनी केली आहे.

