• Mon. Jun 15th, 2026
    चार मुलं पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यात पोहायला उतरली अन् त्यांची अखेर…; पुलाच्या कामाला धोकादायक वळण

    Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे रेल्वे पुलाच्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दारव्हा-नेर मार्गालगत रेल्वे स्टेशन परिसरात घडली. रेल्वेमार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात ही दुर्घटना घडली. खड्ड्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर आरोप केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रवी राऊत, यवतमाळ : दारव्हा-नेर मार्गालगत रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार निरागस मुलांचा मृत्यू झाला आहे. दारव्हा येथे बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. पूल बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डा जीवघेणा ठरला आहे.

    रिहान असलम खान (१३), गोलु पांडुरंग नारनवरे (१०), सोम्या सतीश खडसन (१०) आणि वैभव आशीष बोधले (१४) रा. दारव्हा अशी मृत मुलांची नावे आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाच्या कामाचा वेग वाढला आहे. दारव्हा शहरालगत पुलांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पुलाचे स्तंभ उभारण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी काही मुले पोहण्यासाठी या खड्ड्यात उतरली. मात्र खोल पाण्यात शिरल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. ते बेशुद्ध होऊ लागल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत केली.
    Maharashtra Timesपावसाचा धुमाकूळ: राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्त बंद, एसटी बसही ठप्प, कोल्हापुरात नेमकी काय आहे स्थिती?
    मुलांना बाहेर काढून दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथील संजीवनी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले. या दुर्घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पावसामुळे हे खड्डे तुडुंब भरलेले आहेत. परंतु या खड्ड्यांभोवती सुरक्षेची कोणतीही सोय नाही. रेल्वे बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

    दरम्यान राज्यात सर्वदूर पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडमध्ये पावसाच्या तडाख्याने ११ जणांचा बळी गेला आहे. तर परभणीत पावसामुळे दोन तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. तिकडे पुण्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर ठाणे, कल्याणसह कोकणाला पावासाने अक्षरश: झोडपले आहे. अनेक ठिकाणी अघटीत घटना घडल्या आहेत. तर जनजीवन पूर्णत: ठप्प झाले आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासन यंत्रणा कार्यरत आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा