Ratnagiri News: चिपळूणच्या डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात महाडमधील एका महिलेच्या पोटातून तीन किलोहून अधिक वजनाची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. महिलेला मासिक पाळीचा त्रास आणि पोटदुखीमुळे खूप त्रास होत होता. तपासणीत गर्भाशयात फायब्रॉइड (गाठ) असल्याचे निदान झाले.
वयाच्या साधारपणे चाळीशीच्या अनेक स्रियांना अशा स्वरूपाचा आजार असतो. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला थोडेसे दुर्लक्ष केले. पण नातेवाईकांच्या सल्ल्याने त्यांनी मुंबई येथे तपासणी करून घेतली. पण तिथे मात्र गर्भाशय किंवा अंडाशयाच्या कर्करोगाची शक्यता व्यक्त करत एम.आर. आय. चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्यांना टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबई येथे त्यांना पाठवण्यात आले होते. मात्र अपॉइंटमेंटसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी चिपळूण डेरवण येथील वालावलकर रुग्णालय गाठले.
बिल्डिंगमधून 6 लाखांचा ऐवज लुटला, पण नंतर थेट जीवाला मुकला; पाईपवरून खाली उतरताना चौथ्या मजल्यावरून पडून चोरटा ठार
वालावलकर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लागेचच एम.आर.आय. तपासणी झाली आणि त्यात ही गाठ गर्भाशयातील फायब्रोइड (गाठ) असल्याचे निष्पन्न झाले. हे निदान झाल्यानंतर प्रणालीला हायसे वाटले, पण हिमोग्लोबिन फक्त सहा ग्राम असल्याने तीन बाटल्या रक्त देऊन आधी तब्बेत सुधारण्यासाठी प्रयत्न झाले. लगेचच शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण गर्भाशय, दोन्ही अंडाशय आणि नलिका काढण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया स्त्री रोगतज्ञ डॉ.रक्षा शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. वैष्णवी गोरे आणि डॉ. निहारिका राऊळ यांच्या सहाय्याने पार पडली. शस्त्रक्रिया दीड तास चालली आणि त्यांच्या पोटातून आठ महिन्यांच्या गर्भासारखी दिसणारी तब्बल ३.७७५ किलोची ३० X ३० सेंटिमीटर मोठी गाठ काढण्यात डॉक्टरना यश आले. आता प्रणालीची तब्बेत सुधारते आहे. पोटदुखी आणि मासिक पाळीचा त्रास पूर्णपणे थांबला आहे.
दरम्यान, फायब्रॉईड हा दर पाच स्त्रियांमागे एकीला होणारा आजार आहे. ही गाठ गर्भाशयातील स्नायुंची असते आणि यात कॅन्सर असण्याची शक्यता फार कमी असून प्रजननक्षम वयातील स्त्रियांमध्ये दिसून येते. त्यामुळे घाबरून न जाता त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचं सल्ला घेणे आवश्यक आहे, अशी माहिती वालावलकर रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी दिली.

