Dhule Crime News: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात स्वातंत्र्यदिनी संतापजनक घटना घडली असून एका आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी अनिल काळे याला अटक करण्यात आली असून, संतप्त जमावाने त्याच्या हॉटेलची तोडफोड केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, 15 ऑगस्ट रोजी या नराधमाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती परिसरात पसरताच संतप्त जमावाने आरोपीच्या हॉटेलची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Solapur News : दक्षिण सोलापुरात अनेक गावांचा संपर्क तुटला, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, शेतकऱ्यांना अन् नागरिकांना सतर्कतेचा इशारा
याप्रकरणी संतप्त आदिवासी संघटनांनी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन सादर केले असून, हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट-ट्रॅक कोर्ट) चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीच्या चहा-नाश्त्याच्या हॉटेलच्या झडतीमध्ये पोलिसांना गांजासदृश पदार्थ आणि दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आज (16 ऑगस्ट) सकाळी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने भेट देऊन पुरावे गोळा केले. पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी आणि सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनीही घटनास्थळाची पाहणी करून तपासाला गती दिली आहे. शिरपूर तालुका पोलीस या प्रकरणाचा युद्धपातळीवर तपास करत असून आरोपीला नेमकी काय शिक्षा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

