Mumbai News: दहीहंडीच्या उत्सवाला हजेरी लावलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर भाष्य करताना ठाकरे बंधूंना आव्हान दिलं आहे. मुंबईत आता परिवर्तन अटळ असल्याचं सांगत आम्ही महापालिकेतील पापाची हंडी फोडली असल्याचं ते म्हणाले.
वरळीतील गोविंदा पथकाने छावा मनोरा सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले आणि हंडी फोडली. त्यानंतर ते आमदार राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिममधील दहीहंडी उत्सवात सहभागी झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांना डिवचत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “यंदा मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे, महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता तिथे विकासाची हंडी लागली जाईल आणि त्यातील लोणी सर्वसामान्यांना वाटलं जाणार,” असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मोठी बातमी! मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, मानखुर्दमध्ये गोविंदाचा मृत्यू
“आतापर्यंत महापालिकेतील लोणी कुठे जात होतं तुम्हाला माहीत आहे. तुम्ही माझ्या तोंडून काढायचा प्रयत्न करताय, पण जनतेला ही ते माहीत,” असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.
भाजपसमोर ठाकरे बंधूंचं आव्हान
मुंबई महानगरपालिका जिंकण्याचं स्वप्न पाहत असलेल्या भाजपसमोर यंदाच्या निवडणुकीत उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचं आव्हान असणार आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनोमिलन झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. अनेक वर्षांनंतर मुंबईत ठाकरेंची ताकद एकवटणार असल्याने याचा निवडणुकीत परिणाम दिसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाकरेंची ताकद भेदण्यासाठी कोणते राजकीय डावपेच टाकले जातात आणि मुंबईवर कोणाचा झेंडा फडकतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

