• Sun. Mar 15th, 2026
    बनावट फोटो, कागदपत्रं, खोट्या सह्या… खऱ्या मालकाला पत्ताच नाही, जमिनीचे खोटे व्यवहार करणारे बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात

    Raigad Crime News : रायगडमधील महाड आणि पोलादपूर तालुक्यात जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकार उघडकीस आले आहेत. खऱ्या मालकाची खोटी कागदपत्र, खोट्या सह्या करत जमिनी हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जमिनीचे गैरव्यवहार प्रकार समोर आले आहेत. मूळ जमीन मालकाचे बनावट फोटो, कागदपत्रे, खोट्या सह्या करून खरेदी दस्त केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    महाड तालुक्यातील मौजे उगवते कोंड येथील जमीन मालक मुकुल सुभाष यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता संबंधित आरोपींनी महाड दुय्यम निबंधक कार्यालय येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटा दस्तऐवज बनवला. याबाबत मूळ मालकाला बातमी समजली असता त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

    आरोपी प्रकाश राजाराम निकम रा. शिवाजीनगर तालुका पोलादपूर, संतोष सखाराम शिंदे रा. मोरगिरी तालुका पोलादपूर, पूजा प्रकाश निकम रा.शिवाजीनगर तालुका पोलादपूर, सीमा संतोष शिंदे रा. मोरगिरी तालुका पोलादपूर आणि बनावट खातेदार चंद्रशेखर देवचंद शेठ राहणार गोवंडी या पाच जणांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 420, 406, 465, 467, 468, 471, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

    महाड व पोलादपूर तालुक्यामध्ये जमिनीचे खूप मोठे गैरव्यवहार सुरू असून मूळ मालकांनो सावधान व्हा तसंच काही तक्रार असल्यास पोलीस ठाणे येथे संपर्क करा, असं आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा